गेल्या वर्षी पहिलेवहिले राष्ट्रीय जेतेपद पटकावल्यानंतर आक्रस्ताळ्या पद्धतीने विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या टेबल टेनिसपटू ए. अमलराजला आर्थिक दंडाची शिक्षा झाली होती. मात्र हा कटू प्रसंग विसरून पुन्हा एकदा जेतेपदावर कब्जा करण्याचा निर्धार अमलराजने व्यक्त केला.
आनंद कसा व्यक्त करायचा याबाबत मी काहीही ठरवलेले नाही. त्या वेळी माझ्या मनात जे काही येईल त्याप्रमाणे मी वागेन. अशा गोष्टी आधीच ठरवता येत नाहीत, असे त्याने पुढे सांगितले.
 गेल्या वर्षी रॅकेट फेकून त्यानंतर टेबलावर उडय़ा मारत आनंद साजरा केल्यामुळे अमलराजच्या मानधनातून २५ टक्के रक्कम कापून घेण्यात आली होती. जेतेपदासाठी जबरदस्त मुकाबला रंगणार आहे. सौम्यजित घोष, अचंता शरथ कमाल यांचे कडवे आव्हान माझ्यासमोर असणार आहे. सुरुवात चांगली करण्यावर माझा भर असेल. राष्ट्रीय जेतेपद पटकावण्याचे स्वप्न गेल्या वर्षी पूर्ण झाले.
आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही माझी कामगिरी चांगली झाली असल्याचे पोलंडहून परतलेल्या अमलराजने सांगितले.
दरम्यान महिला गटात पौलमी घटक जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. के. शामिनी आणि अंकिता दास यांचे आव्हान तगडे असल्याचे पौलमीने सांगितले. गेल्या वर्षी मला पाठ, घोटा आणि गुडघ्याच्या दुखापतीने सतावले होते. इराणमध्ये झालेल्या स्पर्धेत पौलमीने एकेरीत कांस्यपदक पटकावले होते. ऑस्ट्रियातील प्रशिक्षण शिबीर आटोपून पौलमी राष्ट्रीय जेतेपदासाठी सज्ज झाली आहे.

Story img Loader