स्पेनमध्ये सुरू असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत ५७ किलो गटात भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. अमन शेरावत याने भारताला हे यश मिळवून दिले आहे. ५७ किलो गटात सुवर्णपदक जिंकणारा अमन पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.

अमनने दुसऱ्या सत्रात आपले सर्व गुण मिळवले, तर त्याच्या प्रतिस्पर्ध्याने प्रत्येक सत्रात गुण मिळवले. अमनचे हे हंगामातील चौथे पदक आहे. त्याने अल्माटीमध्ये सुवर्ण, डॅन कोलोव्हमध्ये रौप्य आणि यासार डोगूमध्ये कांस्यपदक जिंकलेले आहे.

या अगोदर भारताची अंकुश फंगल (५० किलो वजनी गट) २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकाची मानकरी ठरली आहे. अंकुश निर्णायक लढतीत जपानच्या युई सुसाकीकडून पराभूत झाली. सुसाकीने अवघ्या ५२ सेकंदात दुहेरी पट काढून अंकुशला चितपट केले. विशेष म्हणजे सुसाकीने विजेतेपदापर्यंतच्या सर्व लढती चितपट जिंकल्या.

दरम्यान, मुलींच्या ५९ किलो वजनी गटात मानसीने कांस्यपदकाच्या लढतीत लात्वियाच्या रमिना मामेडोवाने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे मानसी पदकाची मानकरी ठरली.