Aman Sehrawat Railway Promotion: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू अमन सेहरावत याला उत्तर रेल्वेने बढती दिली आहे. भारताचा २१ वर्षीय तरूण कुस्तीपटू अमन सेहरावतने ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील देशाचे हे सहावे पदक आहे. अमनने कुस्तीमध्ये अमनने आक्रमक खेळी करत कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोचा कुस्तीपटू डेरियन तोई क्रूझचा तब्बल १३-५ अशा मोठ्या फरकाने पराभव केला.
अमन सेहरावतला आता उत्तर रेल्वेमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (OSD)/क्रीडा या पदावर बढती देण्यात आली आहे. शोभन चौधरी, महाव्यवस्थापक, उत्तर रेल्वे, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी सुजित कुमार मिश्रा यांनी अमन सेहरावतला ऑलिम्पिक पदक जिंकल्याबद्दल पदोन्नती दिली आणि त्याची OSD/क्रीडा म्हणून नियुक्ती केली. यावेळी उत्तर रेल्वे क्रीडा संघटनेचे वरिष्ठ अधिकारी व खेळाडू उपस्थित होते.
भारताचा फ्री स्टाईल कुस्तीपटू अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून देशाचा गौरव केला. कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे, अमनची ही कामगिर लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. तो उत्तर रेल्वेत टीटी म्हणून कार्यरत होता. नोकरीबरोबरच त्याने कुस्तीही सुरू ठेवली. आज कांस्य पदक जिंकून त्याने संपूर्ण जगात भारताचा गौरव केला आहे हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे.
हेही वाचा – Aman Sehrawat: अमन सेहरावतची दुर्दम्य कहाणी; लहानपणीच आईबाबांना गमावलं, सुशील कुमार ठरला प्रेरणादायी
अमनच्या या कामगिरीसाठी दिल्लीच्या इंडिया गेटजवळील बडोदा हाऊसमध्ये उत्तर रेल्वेने त्याचा गौरव केला. कुस्तीपटू अमन सेहरावतच्या सत्कारावेळी उत्तर रेल्वे क्रीडा संघटनेचे वरिष्ठ अधिकारी आणि खेळाडूही उपस्थित होते. सर्वांनी अमन सेहरावतची भेट घेऊन त्याचे अभिनंदन केले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा अमन हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. अमनने २१ वर्षे आणि २४ दिवस वय असताना ही कामगिरी केली आहे.
हेही वाचा – कष्टाचं चीज झालं! ९ वर्षांपासून रखडलेली बढती, स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिक पदक जिंकता
अमन सेहरावतआधी ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणारा आणखी एक भारतीय खेळाडू नेमबाज स्वप्नील कुसाळे याला भारतीय रेल्वेसाठी प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) वरून ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (OSD) अशी दुहेरी पदोन्नती मिळाली. कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकले.
© IE Online Media Services (P) Ltd