Paris Olympics 2024: भारताच्या २१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. अमनने चुरशीच्या लढतीत पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूचा १३-५ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. अशाप्रकारे पॅरिस ऑलिम्पिकच्या १४ व्या दिवशी भारताने सहावे पदक जिंकले आहे. भारताच्या अमन सेहरावतने पहिल्या फेरीत वर्चस्व राखले आणि प्रतिस्पर्ध्यावर ६-३ अशी आघाडी घेतली. यानंतर अमनने दुसऱ्या फेरीतही आपली आघाडी कायम राखली.
हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 14: भारताला मिळालं पॅरिस ऑलिम्पिकमधील सहावं पदक, अमन सेहरावतने जिंकलं कांस्यपदक
अमन आशियाई चॅम्पियन राहिला असून २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताला कुस्तीत पदकाची अपेक्षा होती, ती अमनने पूर्ण केली आहे. याआधी सर्वांना विनेश फोगटकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती मात्र अतिरिक्त वजनामुळे तिला साम्यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले. अशा परिस्थितीत अमनचे हे पदक कुस्तीत भारतासाठी दिलासादायक बाब ठरले आहे.
सामन्याच्या शेवटच्या दोन मिनिटांत अमनने पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूवर ८-५ अशी आघाडी घेतली. यादरम्यान क्रुझ डॅरिएन तोई पूर्णपणे दमलेला दिसला. परिस्थिती अशी बनली की त्याला ब्रेक घ्यावा लागला. शेवटची एक मिनिट बाकी असताना अमनने १२-५ अशी आघाडी मिळवली होती. वेळ संपताच अमनने १३ गुणांसह सामना जिंकला. अशा प्रकारे भारताला १४व्या दिवशी सहावे पदक मिळाले आहे.
हेही वाचा – Vinesh Phogat: विनेश फोगटला पदक मिळणार की नाही? याचिकेसंदर्भात आली नवी अपडेट…
अमन सेहरावतच्या पदकाने ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कुस्तीची शान कायम ठेवली आहे. २००८ पासून भारताने सलग ५ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये पदके जिंकली आहेत. हॉकीनंतर भारताची सर्वाधिक ८ ऑलिम्पिक पदकं कुस्तीतून आली आहेत. ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच, १९५२ मध्ये, केडी जाधवने भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले. यानंतर ५६ वर्षे भारताला कुस्तीमध्ये पदक मिळाले नाही आणि त्यानंतर सुशील कुमारने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून हा दुष्काळ संपवला. तेव्हापासून भारतीय कुस्तीपटू ऑलिम्पिकमध्ये सातत्याने पदके जिंकत आहेत.
रवी कुमार दहियाने ५७ किलो वजनी गटात गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले होते. अमनने राष्ट्रीय निवड चाचणीत रवीचा पराभव करून ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती. तत्पूर्वी, अमन सेहरावतने उपांत्यपूर्व फेरीत अल्बेनियाच्या झेलीमखान अबाकारोववर तांत्रिक श्रेष्ठतेच्या (१२-०) जोरावर उपांत्य फेरी गाठून पदकाची आशा दिली होती.
© IE Online Media Services (P) Ltd