निवडीवरून वाद बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची आगामी रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय चमूचा सदिच्छा दूत ( ब्रँड अॅम्बेसेडर) नेमणूक झाल्यावरून सुरू झालेला वाद अद्यापही शमलेला नाही.  सुरूवातीला भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने सलमानच्या निवडीवर आक्षेप घेतल्यानंतर रविवारी भारताचे महान अॅथलिट मिल्खासिंग यांनीदेखील या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. माझा सलमान खानला विरोध नसला तरी रिओ ऑलिम्पिकसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीचीच निवड झाली पाहिजे होती, असे स्पष्ट मत मिल्खासिंग यांनी व्यक्त केले. योगेश्वर दत्त यानेदेखील शनिवारी या निर्णयाबद्दल ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली होती. ‘ऑलिम्पिक पथकाच्या सदिच्छादूतपदी नियुक्ती होण्यात सलमानचे काहीही योगदान नाही. प्रत्येकाला चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा अधिकार आहे. परंतु ऑलिम्पिक हे चित्रपट लोकांपर्यंत पोहचवण्याचे माध्यम नाही, अशा शब्दांत योगेश्वर दत्तने आपली नाराजी व्यक्त केली होती. सदिच्छादूताची नक्की भूमिका काय असते असा सवालही योगेश्वरने उपस्थित केला होता. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार सरदारसिंग, अभिनव बिंद्रा व मेरीकोम यांनी सलमानच्या निवडीचे समर्थन केले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून भारतीय खेळाडुंमध्ये एकप्रकारे फुट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


ऑलिम्पिक समितीकडून सलमान खानच्या नियुक्तीचे समर्थन करण्यात आले असून सदिच्छादूत पद हे मानद असून, यात आर्थिक लाभाचा विषय नाही. सलमानच्या माध्यमातून अधिकाअधिक व्यक्तींपर्यंत ऑलिम्पिक क्रीडाप्रकार आणि क्रीडापटूंना नेणे हे आमचे उद्दिष्ट आहे’, असे भारतीय ऑलिम्पिक समितीचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी सांगितले होते. कुस्तीपटूची भूमिका असलेला सलमानचा सुलतान हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.

खेळाडू केंद्रस्थानी हवेत-विश्वनाथन आनंद
रिओसाठी पात्र ठरलेल्या क्रीडापटूंच्या मागण्या पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे असे मत अव्वल बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने व्यक्त केले. तो पुढे म्हणाला, ‘ऑलिम्पिक चळवळीशी अधिकाअधिक लोक संलग्न होणे चांगली गोष्ट आहे. परंतु या प्रक्रियेत खेळाचा आत्मा हरवता कामा नये. खेळाडूंच्या मागण्या काय आहेत यावर भर दिल्यास बिगरक्रीडापटू व्यक्तींच्या हितसंबंधांचा प्रश्नच उद्भवणार नाही. दोन्ही गोष्टी मिळून खेळाडूंचे भले होणे महत्त्वाचे आहे. रिओसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचा सराव सुरू झाला आहे. त्यांना शुभेच्छा!’

Story img Loader