भारताच्या फलंदाजीचे अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवरसुद्धा तेजोमय दर्शन घडले. त्यामुळे भारताला आणखी एका शानदार विजयाची नोंद करता आली. अंबाती रायुडूने आपल्या कारकीर्दीतील पहिलेवहिले शतक साकारून सर्वाचे लक्ष वेधून घेतले.
गुरुवारी दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध सहा विकेट राखून विजय मिळवताना पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या (९२) चिवट फलंदाजीच्या बळावर ५० षटकांत ८ बाद २७४ धावा केल्या. भारताने हे आव्हान ४४.३ षटकांत आरामात पेलले.
विराट कोहलीने रायुडूला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाचारण केले. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना रायुडूने ११८ चेंडूंत १० चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने १२१ धावांची नाबाद खेळी साकारली. रायुडूने शिखर धवन (७९) सोबत दुसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची तर विराट कोहली (४९) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यावेळी श्रीलंकेचा अननुभवी गोलंदाजीचा मारा हतबल जाणवत होता. लेग-स्पिनर सेक्युगे प्रसन्नाला चौकार खेचून रायुडूने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
पहिले शतक साकारणाऱ्या वयेशीर फलंदाजांच्या यादीत सुनील गावस्कर, मोहिंदर अमरनाथ आणि रॉबिन सिंग यांच्यानंतर आता २९ वर्षीय रायुडूचा चौथा क्रमांक लागतो.
अर्धशतकानंतर रायुडूचा आत्मविश्वास दुणावला आणि त्याने धम्मिका प्रसादला तिसरा षटकार ठोकला. रायुडूची याआधी नाबाद ६४ ही सर्वोच्च धावसंख्या होती. शतकी खेळीसह दोन झेल आणि एकाला धावचीत करणाऱ्या रायुडूलाच सामनावीर किताबाने गौरवण्यात आले.
अजिंक्य रहाणे फार काळ मैदानावर टिकू न शकला नाही. परंतु गुंटूरमध्ये जन्मलेल्या रायुडूने भारतीय धावसंख्येला स्थर्य देणारी फलंदाजी केली. धवनने ८० चेंडूंत ७९ धावा काढताना एक षटकार आणि सात चौकार मारले.
त्याआधी, मॅथ्यूजच्या दिमाखदार फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने ८ बाद २७४ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. पाहुण्या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर त्यांचे काही फलंदाज लवकर बाद झाले, परंतु मॅथ्यूजने १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ९२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. कुमार संगकाराने ६१ धावा काढत त्याला छान साथ दिली.
३ बाद ६४ अशा कठीण परिस्थितीनंतर मॅथ्यूज आणि संगकारा जोडीने चौथ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली. ४४व्या षटकांत श्रीलंकेने ८ बाद २२० धावा केल्या होत्या. तेव्हा मॅथ्यूजला दहाव्या क्रमांकावरील फलंदाज धम्मिका प्रसादची साथ लाभली. या जोडीने नवव्या विकेटसाठी बहुमोल नाबाद ५४ धावांची भागीदारी साकारली.
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ५४ धावांत दोन बळी घेतले. तसेच रविचंद्रन अश्विन आणि युवा अक्षर पटेल या फिरकीपटूंनी प्रत्येकी दोन बळी घेतले. वरुण आरोनऐवजी संघात स्थान मिळवणाऱ्या रवींद्र जडेजाला फक्त एक बळी मिळाला, परंतु त्यासाठी त्याने ६४ धावा मोजल्या. अनुभवी इशांत शर्माने प्रारंभी टिच्चून गोलंदाजी केली, परंतु त्याच्या शेवटच्या षटकांमध्ये श्रीलंकेच्या फलंदाजांनी जोरदार आक्रमण केले. त्याच्या गोलंदाजीवर एकंदर ५८ धावा काढल्या.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ५० षटकांत ८ बाद २७४ (कुमार संगकारा ६१, अँजेलो मॅथ्यूज नाबाद ९२, धम्मिका प्रसाद नाबाद ३०; अक्षर पटेल २/३९) पराभूत वि. भारत : ४४.३ षटकांत ४ बाद २७५ (शिखर धवन ७९, अंबाती रायुडू नाबाद १२१, विराट कोहली ४९; सीक्युगे प्रसन्ना ३/५३)
सामनावीर : अंबाती रायुडू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा