भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने, अंबाती रायुडूला भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळेल असं भाकीत केलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात रायुडूने केलेल्या खेळीमुळे भारताने 252 धावांपर्यंत मजल मारली होती. या कामगिरीसाठी त्याची सामनावीर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. याआधीच्या सामन्यांमध्ये रायुडूची कामगिरी खालावली होती, मात्र मोक्याच्या क्षणी रायुडूने आपला खेळ उंचावत चौथ्या स्थानावरची आपली दावेदारी पक्की केली.
अवश्य वाचा – परदेशी खेळपट्ट्यांवर कुलदीप यादव सर्वोत्तम फिरकीपटू – रवी शास्त्री
“रायुडूने चांगला खेळ केला. मधल्या काही सामन्यांमध्ये तो चाचपडत होता, मात्र मोक्याच्या क्षणी त्याला सूर गवसलाय आणि त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यामुळे त्याला भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळेल अशी मला आशा आहे.” India TV ला दिलेल्या मुलाखतीत रायुडू बोलत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माने धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे विश्वचषकाच्या संघात नेमक्या कोणाची निवड होते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.