Under-19 Cricket world cup: अमेरिकेने (USA) १९ वर्षाखालील पुरुष विश्वचषक पात्रता फेरीत अर्जेंटिनाचा ४५० धावांनी पराभव करून क्रिकेट विश्वात एक मोठा इतिहास रचला आहे. संघाने अंडर-१९ क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय नोंदवला. त्यांनी या विजयासह ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला. या बाबतीत भारत ऑस्ट्रेलियाच्या खाली म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर आहे. अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेने ५० षटकात ८ विकेट्स गमावत ५१५ धावांचा महाकाय डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात अर्जेंटिनाचा संघ केवळ १९.५ षटकांत ६५ धावांत सर्वबाद झाला.
अमेरिकेकडून भव्य मेहताने ९१ चेंडूत १३६ धावा करत शानदार शतक झळकावले. त्याचवेळी कर्णधार ऋषी रमेशने ५९ चेंडूत १०० धावांची तुफानी खेळी केली. याशिवाय अर्जुन महेशने ४४ चेंडूत ६७ धावा करत संघाची धावगती पुढे नेण्यात मदत केली. अर्जेंटिनाच्या कमकुवत गोलंदाजीसमोर प्रणव चेट्टीपलायमने ४३ चेंडूत ६१ धावा करत वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. अमोघ आरेपल्लीने ३० चेंडूत ४८ आणि उत्कर्ष श्रीवास्तवने २२ चेंडूत ४५ धावा केल्या. अर्जेंटिनाकडून इग्नासिओ मॉस्केराने ९ षटकांत ९६ धावांत २ विकेट्स घेतल्या. लुकास रॉसी मेंडिझाबलने १० षटकात १०७ धावा देत एक विकेट घेतली. फेलिप पिनीने ६ षटकांत ७१ धावा देत २ विकेट्स घेतल्या. फेलिप दास नेवेसने १० षटकात ८३ धावा देत एक विकेट घेतली. यावरून एक कळते की सर्वच गोलंदाजांना अक्षरशः धुतले आहे.
अमेरिकेच्या अरिन नाडकर्णीने ६ विकेट्स घेतल्या
अर्जेंटिनाच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, आठ फलंदाज दुहेरी आकडा देखील गाठू शकले नाही म्हणजे १० पेक्षा कमी धावा करत बाद झाले. अर्जेंटिनाकडून सर्वाधिक थिओ व्रुग्डेनहिलने ४४ चेंडूत १८ धावा केल्या. याशिवाय फेलिप दास नेवेसने १६ चेंडूत १५ धावा केल्या. इग्नासिओ मॉस्केराने १० धावा केल्या. अमेरिकेकडून अरिन नाडकर्णीने भेदक गोलंदाजी करत ६ षटकांत २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. याशिवाय आर्यन सतीशने ३.५ षटकात १७ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. पार्थ पटेल आणि आर्यन बत्रा यांनी या दोघांना मदत करत प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
अंडर १९ क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय
अंडर १९ क्रिकेटमधील जर सर्वात मोठ्या विजयांबद्दल बोलायचे तर अमेरिकेने ऑस्ट्रेलिया विक्रम मोडला असून आता ते या यादीत अव्वल स्थानावर पोहचले आहेत. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी होता. जानेवारी २००२मध्ये त्याने केनियाचा ४३० धावांनी पराभव केला. २०२२ मध्ये भारताने युगांडाचा ३२६ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने २०१८ मध्ये पापुआ न्यू गिनीचा ३११ने पराभव केला. २०१८ मध्ये श्रीलंकेने केनियाचा ३११ धावांनी पराभव केला होता. २००२ मध्ये वेस्ट इंडिजने स्कॉटलंडचा ३०१ धावांनी पराभव केला होता.