अमेरिका, रशिया व इराण यांच्यात राजकीय मतभेद असले तरी कुस्ती या प्राचीन क्रीडा प्रकाराचे ऑलिम्पिकमधील स्थान राखण्यासाठी या तीन देशांचे कुस्ती संघटक एकत्र येणार आहेत.
कुस्तीमध्ये खेळाडूंना दुखापती होण्याचे प्रमाण अधिक आहे, खेळ खूपच कंटाळवाणा असून प्रेक्षकांमध्ये त्याला फारसे स्थान नाही, आदी कारणास्तव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २०२० च्या ऑलिम्पिकपासून कुस्तीला वगळण्याचे ठरविले आहे. त्यांच्या या निर्णयाविरुद्ध अमेरिका, रशिया व इराणच्या कुस्ती संघटकांनी जगभर व्यापक प्रचार मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथे या तीनही देशांच्या मल्लांमध्ये प्रदर्शनीय सामने आयोजित करण्यात आले आहेत. येथे गुरुवारी व लॉसएंजेलिस येथे रविवारी पुन्हा या लढतींचे आयोजन केले जाणार आहे. हा खेळ कसा लोकप्रिय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ऑलिम्पिक समितीपुढे उपोषण करण्याचाही निर्णय काही खेळाडू व संघटकांनी घेतला असून समितीचा निषेध म्हणून ऑलिम्पिक पदके समितीकडे परत केली जाणार आहेत.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी, आपण हा खेळ ऑलिम्पिकमध्ये ठेवला जाईल यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करु असे आश्वासन दिले आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघासही कुस्तीचे स्थान अबाधित राहील अशी आशा वाटत आहे. रशियाचे ऑलिम्पिक पथक प्रशिक्षक ख्रिस्ताकिस अ‍ॅलेक्झांद्रिस म्हणाले, की कुस्ती या खेळाद्वारे खेळाडूच्या केवळ शारीरिक संपदेचे दर्शन घडते असे नव्हे, तर त्याच्या इच्छाशक्ती व जिद्दीचाही प्रत्यय येत असतो.
आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी लवकरच विराजमान होणारे संघटक नेनाद लालोविक यांनी सांगितले,की ऑलिम्पिक समितीचा निर्णय धक्कादायक आहे. हा खेळ प्राचीन असला तरी अतिशय आकर्षक खेळ म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेले बदल लक्षात घेऊन या खेळानेही थोडी कात टाकण्याची आवश्यकता आहे.