एपी, न्यूयॉर्क

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने पहिला सेट गमावल्यानंतरही जोरदार पुनरागमन करताना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता पेगुलासमोर अंतिम सामन्यात अरिना सबालेन्काचे आव्हान असणार आहे.

सहाव्या मानांकित पेगुलाने उपांत्य सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हावर १-६, ६-४, ६-२ असा विजय मिळवला. पेगुलासाठी सामन्याची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या सेटमध्ये मुचोव्हाने आक्रमक खेळ करत पेगुलाला कोणतीच संधी दिली नाही व सेट २८ मिनिटांत जिंकला. तिने पहिल्या नऊ गेमपैकी आठमध्ये विजय नोंदवला. दुसऱ्या सेटमध्येही मुचोव्हा ३-० अशी आघाडीवर होती. मात्र, पेगुलाने आपला खेळ उंचावताना मुचोव्हाला अडचणीत आणले व सेट जिंकत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्ये पेगुलाने आपली हीच लय कायम राखली. निर्णायक सेटमध्ये चमकदार कामगिरी करत तिने सामन्यात विजय नोंदवला. पेगुलाचा गेल्या १६ सामन्यांतून १५ वा विजय आहे. यासह पेगुलाने प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

हेही वाचा >>>Josh Inglis : जोश इंगलिसने ४३ चेंडूत झळकावले शतक, फक्त षटकार-चौकारांसह केल्या ७० धावा, मोडला मॅक्सवेल-फिंचचा विक्रम

अन्य उपांत्य सामन्यात सबालेन्काने १३व्या मानांकित एमा नवारोला ६-३, ७-६ (७-२) असे सरळ सेटमध्ये नमवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. सामन्यातील पहिला सेट जिंकताना सबालेन्काला फारशी अडचण आली नाही. दुसऱ्या सेटमध्ये नवारोने सबालेन्काला चांगले आव्हान दिले. त्यामुळे हा सेट टायब्रेकरमध्ये गेला. सबालेन्काने आपल्या अनुभवाच्या जोरावर नवारोला सामन्यात पुनरागमन करू न देता विजय मिळवला. त्यामुळे यंदा तरी सबालेन्का अमेरिकन टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवणार का, याकडे सर्वांचे लक्ष राहील.

एरानी, वावसोरीला मिश्र दुहेरीचे जेतेपद

सारा एरानी व आंद्रेआ वावसोरी या इटलीच्या जोडीने अमेरिकेच्या टेलर टाउनसेंट व डॉनल्ड यंग जोडीला ७-६ (७-०), ७-५ असे पराभूत करत अमेरिकन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. एरानीने जॅस्मिन पाओलिनीसह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला दुहेरीचे सुवर्णपदक पटकावले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American jessica pegula advances to us open women singles final sport news amy