एपी, न्यूयॉर्क
महिला गटातील गतविजेत्या अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्वीऑनटेकचे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. तिला २० व्या मानांकित लॅट्वियाच्या येलेना ओस्टापेन्कोने पराभूत करत स्पर्धेतील धक्कादायक निकाल नोंदवला. अन्य सामन्यात, सहावी मानांकित अमेरिकेची कोको गॉफ व चेक प्रजासत्ताकची दहावी मानांकित कॅरोलिना मुचोव्हा यांनी पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पुरुष गटात सर्बियाचा दुसरा मानांकित नोवाक जोकोविच व नवव्या मानांकित अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झ यांनी पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
महिला गटात श्वीऑनटेकला जेतेपदासाठी पसंती मिळत होती. मात्र, ओस्टापेन्कोने दमदार कामगिरी केली. ओस्टापेन्कोने श्वीऑनटेकला ३-६, ६-३, ६-१ असे नमवले. सामन्यातील पहिला सेट जिंकत श्वीऑनटेकने चांगली सुरुवात केली होती. मात्र, ओस्टापेन्कोने पुढचे दोन्ही सेट जिंकत सामन्यातही विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अन्य सामन्यात, गॉफने डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझ्निआकीवर ६-३, ३-६, ६-१ असा विजय नोंदवत आगेकूच केली. गॉफसमोर आता ओस्टापेन्कोचे आव्हान असेल. मुचोव्हाने उपउपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या वांग झिन्यूचा ६-३, ५-७, ६-१ असा पराभव केला. मुचोव्हाचा सामना पुढील फेरीत रोमानियाच्या सोराना कस्र्टीयाशी होईल. तिने स्वित्र्झलडच्या बेलिंडा बेन्सिचला ६-३, ६-३ असे नमवले.
हेही वाचा >>>‘बीसीसीआय’अध्यक्ष रॉजर बिन्नी पाकिस्तानात दाखल
पुरुष गटात २३ ग्रँडस्लॅम विजेता जोकोविचने आपली लय कायम राखताना क्रोएशियाच्या बोर्ना गोजोवर ६-२, ७-५, ६-४ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. सामन्यातील पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये गोजोने जोकोविचसमोर आव्हान उपस्थित केले. मात्र, सेट जिंकत सामन्यात आघाडी भक्कम केली. तिसऱ्या सेटमध्येही त्याने ही लय कायम राखत विजय नोंदवला. फ्रिट्झने स्वित्र्झलडच्या डॉमिनिक स्टीफन स्ट्रीकरला ७-६ (७-२), ६-४, ६-४ असे नमवले. पहिल्या सेटमध्ये फ्रीट्झला स्ट्रीकरने चांगली टक्कर दिली. मात्र, उर्वरित दोन सेटमध्ये फ्रिट्झने त्याला कोणतीही संधी न देता विजय साकारला. तर, अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोने ऑस्ट्रेलियाच्या रिंकी हिजिकाताला ६-४, ६-१, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. अमेरिकेच्या बिगरमानांकित बेन शेल्टनने १४व्या मानांकित आपल्याच देशाच्या टॉमी पॉलवर ६-४, ६-३, ४-६, ६-४ असा विजय मिळवत धक्कादायक निकाल नोंदवला.
बोपन्ना-एब्डेन जोडी उपांत्यपूर्व फेरीत
भारताचा रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियाचा त्याचा साथीदार मॅथ्यू एब्डेन या जोडीने ब्रिटनच्या ज्यूलियन कॅश व हेन्री पॅटेन जोडीला तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात ६-४, ६-७ (५-७), ७-६ (१०-६) असा विजय मिळवत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. हा सामना जवळपास दोन तास २२ मिनिटे चालला.