न्यूयॉर्क : हवामान नाही, पण या वेळी पर्यावरणवाद्यांनी आणलेल्या व्यत्ययानंतरही अमेरिकेच्या १९ वर्षीय कोको गॉफने आपला सर्वोत्तम खेळ करताना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यामुळे कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदापासून कोको आता केवळ एक विजय दूर आहे. जेतेपदासाठी तिला दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्काचे आव्हान असेल.
कोको केवळ १९ वर्षांची असली, तरी तिच्या खेळात वेगळीच परिपक्वता दिसते. आतापर्यंतच्या खेळाने हेच कोकोने सिद्ध केले आहे. तिने उपांत्य फेरीत १०व्या मानांकित कॅरोलिना मुचोवाचा ६-४, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. अन्य उपांत्य लढतीत बेलारुसच्या सबालेन्काने यापूर्वीच्या उपविजेत्या मॅडिसन कीजला ०-६, ७-६ (७-१), ७-६ (१०-५) असे पराभूत केले.
हेही वाचा >>>प्रो कबड्डी लीगचा खेळाडू लिलाव ऑक्टोबरमध्ये
पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये कोको १-० अशी आघाडीवर होती. त्याच वेळी पर्यावरणवाद्यांनी घातलेल्या गोंधळामुळे दोन्ही खेळाडूंनी ‘लॉकर रूम’मध्ये जाणे पसंत केले. परिस्थिती खेळास पूरक झाल्यावर सामना पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतरही कोकोनो आपले वर्चस्व राखले. मात्र, विजयासाठी तिला तब्बल सहा ‘मॅच पॉइंट’ वाचवावे लागले. दुसरीकडे, सबालेन्काला विजयासाठी तीन सेटपर्यंत संघर्ष करावा लागला. पहिल्या सेटमध्ये तर सबालेन्काला एकही गेम जिंकता आला नाही. नंतरचे दोन्ही सेट जिंकण्यासाठी सबालेन्काला टायब्रेकरची मदत घ्यावी लागली.