भारताच्या अमित कुमारने सोमवारी विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली. ५५ किलो गटाच्या अंतिम फेरीत इराणच्या हसन रहिमीकडून पराभव पत्करल्यामुळे त्याचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. अमितचे रौप्यपदक हे भारताने विश्व अजिंक्यपद स्पध्रेत मिळवलेले एकंदर आठवे व दुसरे रौप्यपदक आहे.
पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता मल्ल सुशील कुमार याने माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताला अमित कुमार याच्याकडूनच पदकाच्या आशा होत्या. त्याने उपांत्य लढतीत टर्कीचा खेळाडू सेझार अ‍ॅकगुल याच्यावर मात केली. अंतिम लढतीत अमित कुमारची इराणच्या हसन फरमान राहिमी याच्याशी गाठ पडणार आहे.
अमितने पहिल्या लढतीत जपानच्या यासुहिरो इनावा याला सहज हरविले. पाठोपाठ त्याने आक्रमक कौशल्य दाखवित दुसऱ्या फेरीत फ्रान्सच्या जोहीर एल क्वारेज याच्यावर मात केली. उपांत्यपूर्व फेरीत त्याने अमेरिकेच्या अँजेल एस्कोबोदो याच्यावर निर्णायक विजय मिळविला.
भारताच्या अरुण कुमार (६६ किलो) व सत्यव्रत काडियन (९६ किलो) यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. ६६ किलो गटात सुशील कुमारऐवजी संधी मिळालेल्या अरुण कुमार याला पहिल्याच फेरीत हार मानावी लागली.