Amit Mishra wife कानपूरमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल खेळलेल्या आणि माजी क्रिकेटर असलेल्या लेग स्पिनर अमित मिक्षाच्या पत्नीने आता त्याच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. अमित मिश्राची पत्नी गरिमाने हा आरोप केला आहे की अमित आणि त्याचं कुटुंब यांनी माझ्याकडे होंडा सिटी कार आणि १० लाख रुपये मागितले आणि माझा छळ केला. अमित मिश्राचे विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोपही गरिमाने केला आहे.

शुक्रवारी दुपारी अमित मिश्राची पत्नी पोहचली पोलीस ठाण्यात

शुक्रवारी दुपारी अमित मिश्राची पत्नी गरिमा पोलीस ठाण्यात पोहचली. तिने पोलीस आयुक्त अखिल कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी तिला आम्ही या प्रकरणी तपास करुन कारवाई करू असं आश्वासन दिलं आहे. किदवई नगर आरबीआय कॉलनीत राहणाऱ्या अमित मिश्राने हे सगळे आरोप फेटाळले आहेत. अमित मिश्राने म्हटलं आहे की माझी पत्नी गरिमाच माझा छळ करते आहे. काही दिवसांपूर्वी तिने मला बँकेच्या बाहेर तिने मारहाणही केली होती असाही आरोप अमित मिश्राने केला आहे.

विवाहबाह्य संबंध, हुंड्यासाठी छळ अन् मारहाण…

अमित मिश्रा भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे.अमित मिश्रा हा आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज म्हणून ओळखळला जातो. अमित मिश्राची पत्नी गरिमा मिश्रा यांनी पोलिस आयुक्तांना भेटल्यावर जी तक्रार केली त्यात तिने पती अमित मिश्रा आणि सासरच्या लोकांनी पैशासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. गरिमाच्या म्हणण्यानुसार, अमित आणि त्याचे कुटुंब होंडा सिटी कार आणि १० लाख रुपयांसाठी तिचा छळ करतात.याशिवाय, अमित मिश्राचे अनेक महिलांशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप तिने केला आहे.

२०२१ मध्ये अमित आणि गरिमा यांचं लग्न

अमित मिश्रा आणि गरिमा यांचे लग्न २६ एप्रिल २०२१ या दिवशी झालं. अमित सध्या क्रिकेटपासून दूर आहे आणि कानपूरमधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये काम करतो. गरिमा यांनी आरोप केला आहे की, अमित मिश्राने तिला अनेक वेळा मारहाण केली आणि चार महिन्यांपूर्वी डिसेंबरमध्ये जेव्हा तिने त्याच्या इतर महिलांसोबतच्या संबंधांना आक्षेप घेतला. तेव्हा तिला घरातून हाकलून देण्यात आलं होतं. गरिमा सध्या तिच्या माहेरी राहते. दुसरीकडे, अमित मिश्रा यांनी म्हटले आहे की त्यांची पत्नी स्वतः त्यांना त्रास देत आहे. अमित मिश्रा यांनी असेही सांगितले की एकदा त्याच्या पत्नीने त्यांना बँक ऑफिसबाहेर मारहाण केली होती. अमर उजालाने या विषयीचं वृत्त दिलं आहे.