Amol Muzumdar Appointed as Head Coach of Senior Indian Women’s Team: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसआय) अमोल मजुमदार यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. बोर्डाने बुधवारी (२५ ऑक्टोबर) ही घोषणा केली. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा ​​आणि जतिन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवडलेल्या अर्जदारांची मुलाखत घेतली. विचारविनिमय केल्यानंतर त्रिसदस्यीय समितीने एकमताने अमोल मुझुमदार यांची हे पद स्वीकारण्याची शिफारस केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमोल मुझुमदार यांनी २१ वर्षांच्या आपल्या शानदार कारकिर्दीत १७१ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी ३० शतकांच्या मदतीने ११ हजारांहून अधिक धावा केल्या. त्यांनी १०० हून अधिक लिस्ट ए सामने आणि १४ टी-२० सामन्यांमध्येही प्रतिनिधित्व केले आहे. अमोल मुझुमदार यांनी मुंबईसह अनेक रणजी विजेतेपद जिंकले आणि नंतर आसाम आणि आंध्र प्रदेशचे प्रतिनिधित्व केले.

मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल –

बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, “भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार यांच्या नियुक्तीचे मी स्वागत करतो. मला विश्वास आहे की त्याच्या कार्यकाळात संघ खेळाच्या विविध फॉरमॅटमध्ये प्रगती करत राहील आणि चांगली कामगिरी करेल. संघाने द्विपक्षीय आणि बहु-राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की आमच्या खेळाडूंना मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाचा आणि रोडमॅपचा खूप फायदा होईल.”

जय शाह यांनी अमोल मुझुमदारांचे केले अभिनंदन-

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “आमच्या राष्ट्रीय संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी सखोल मूल्यांकन आणि निवड प्रक्रिया आयोजित केल्याबद्दल मी सीएससीचे आभार मानतो. त्याचबरोबर अमोल मुझुमदार यांच्या नियुक्तीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्याच्याकडे अनुभव, कौशल्य आणि आधुनिक खेळाचे सखोल ज्ञान आहे. बीसीसीआय महिला क्रिकेटसाठी दृढ वचनबद्ध आहे आणि संघाला मैदानावर आणि मैदानाबाहेर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक वातावरण प्रदान करत राहील. मंडळ मुझुमदार यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि आमच्या खेळाडूंना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करेल.”

हेही वाचा – AUS vs NED: ग्लेन मॅक्सवेलने ४० चेंडूत वादळी शतक झळकावत रचला इतिहास; ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्समोर ठेवला ४०० धावांचा डोंगर

काय म्हणाले मुझुमदार?

भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणाले, “भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यामुळे मला अत्यंत सन्मान आणि अभिमान वाटत आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि टीम इंडियासाठी माझ्या व्हिजन आणि रोडमॅपवर विश्वास ठेवल्याबद्दल मी सीएसी आणि बीसीसीआयचे आभार मानतो. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि मी प्रतिभावान खेळाडूंसोबत काम करण्यास आणि त्यांना उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी योग्य तयारी आणि मार्गदर्शन प्रदान करण्यास उत्सुक आहे. पुढील दोन वर्षे खूप महत्त्वाची आहेत, कारण या काळात दोन विश्वचषक स्पर्धा होणार आहेत.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol muzumdar appointed as head coach of senior indian womens team by bcci vbm