मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुझुमदारची दक्षिण आफ्रिकेच्या आगामी भारत दौऱ्यासाठी हंगामी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. १५ सप्टेंबरपासून आफ्रिका संघाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होईल. सर्वात प्रथम दोन्ही संघ ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळतील. यानंतर दोन्ही संघात ३ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेकरता अमोल दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना फलंदाजीचे धडे देणार आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने यासंदर्भातल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
१९९४ साली मुंबईकडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अमोल मुझुमदारने एक काळ गाजवला होता. रणजी क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करणारा फलंदाज म्हणून त्याची ओळख होती. मात्र मुंबईच्या या गुणी फलंदाजाला भारतीय संघात कधीच स्थान मिळालं नाही. क्रिकेटमधून निृवृत्ती स्विकारल्यानंतर अमोलने प्रशिक्षणाकडे आपला मोर्चा वळवला. अमोलने BCCI आणि Cricket Australia या नामांकित क्रिकेट बोर्डांकडून मान्यताप्राप्त प्रशिक्षकाचं प्रमाणपत्रही मिळवलं आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सला प्रशिक्षण देण्यासोबतच अमोलने भारताचा १९ वर्षाखालील संघ, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या २३ वर्षाखालील संघालाही प्रशिक्षण दिलं आहे. मध्यंतरी अमोलने नेदरलँडच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे.
सध्याच्या घडीला अमोल हा आमच्यासाठी योग्य उमेदवार आहे. त्याला भारतीय खेळपट्ट्यांची चांगली माहिती आहे. त्यामुळे फलंदाजांना तो योग्य मार्गदर्शन करु शकतो. काही दिवसांपूर्वी भारतात झालेल्या एका कँपमध्ये त्याने आमच्या फलंदाजांना फिरकीपटूंविरोधात कसं खेळावं याचं मार्गदर्शन केलं होतं. याच कारणासाठी अमोलची हंगामी फलंदाजी प्रशिक्षक पदावर नियुक्ती केली जात असल्याचं, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं.