Wankhede Stadium Top 5 matches : मुंबईतील वानखेडे स्टेडियमला भारताची क्रिकेट पंढरी म्हणून संबोधले तर चुकीचे ठरणार नाही. अशा या क्रिकेट पंढरीला ९ जानेवारी २०२५ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. हे वानखेडे स्टेडियम अनेक ऐतिहासिक आणि रोमांचक सामन्यांचे साक्षीदार राहिले. आज आपण अशाच ऐतिहासिक आणि रोमांचक सामन्यांपैकी एक असलेल्या पाच अव्वल सामन्यांबदल जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. भारत विरुद्ध श्रीलंका – आयसीसी एकदिवसीय विश्वचषक फायनल, २०११

भारताने तब्बल २८ वर्षांनी दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरले, तो वानखेडे स्टेडियमच्या क्रिकेट इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण होता. एकदिवसीय विश्वचषक २०११ च्या फायनल सामन्यात यजमान भारत आणि श्रीलंका आमनेसामने होते. ज्यामध्ये श्रीलंकेच्या २७४ धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना, भारत सलामी जोडी लवकर गमवल्याने अडचणीत सापडला होता. मात्र, गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. या सामन्यात गौतम गंभीरचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. गंभीर आऊट झाल्यानंतर धोनीने नुवान कुलसेकराला षटकार मारत भारताच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या सामन्यात धोनी ९१ धावांवर नाबाद राहिला.

२. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरी कसोटी, २०११

मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने ही तिसरी कसोटी फारशी महत्त्वाची नव्हती, तरी देखील ही तिसरी कसोटी रोमहर्षक झाली. कारण भारताने अगोदरच पहिल्या दोन्ही कसोटी जिंकून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी होती. या कसोटीत वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ५९० धावा केल्या होत्या, ज्यामध्ये डॅरेन ब्राव्होचे शानदार शतकी खेळीचे योगदान सर्वात महत्त्वाचे होते. प्रत्युत्तरात आर अश्विनच्या पहिल्या कसोटी शतकामुळे भारताने पराभवाचे अंतर कमी केले. पाहुण्यांचा संघाचा दुसरा डाव १३४ धावांत आटोपला आणि भारतासमोर २४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ही कसोटी भारत हरणार असे वाटत असताना, अनेक चढ-उतारांनंतर यजमानांना हा सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळाले. ज्यामुळे भारताने ही मालिका २-० अशा फरकाने खिशात घातली.

हेही वाचा – Vijay Hazare Trophy : १५ चौकार अन् २ षटकार… देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी बडोद्यावर पडली भारी

३. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी, २००४

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आधीच हरलेल्या मालिकेत भारताकडे या सामन्यात सन्मान वाचवण्याशिवाय दुसरे काहीही नव्हते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नॅथन हॉरिट्झला कसोटी पदार्पणाची संधी दिली होती. तसेच भारताने या सामन्यासाठी गौतम गंभीर आणि दिनेश कार्तिक यांचा संघात समावेश केला होता. भारताचा पहिला डाव अवघ्या १०४ धावांत आटोपला. प्रत्युत्तरात अनिल कुंबळे आणि मुरली कार्तिक यांनी पलटवार करत ऑस्ट्रेलियाला २०३ धावांवर रोखले. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाकडे ९९ धावांची भक्कम आघाडी होती. यानंतर सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने अर्धशतकांसह कसेबसे ऑस्ट्रेलियाला १०७ धावांचे लक्ष्य देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर फिरकीपटू हरभजन सिग आणि मुरली कार्तिकने शानदार गोलंदाजी करत कांगारु संघाला अवघ्या ९३ धावांत गुंडाळले. ज्यामुळे भारताने हा रोमहर्षक सामना अवघ्या १३ धावांनी जिंकला.

४. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, आयपीएल २०१४

आयपीएल २०१४ च्या हंगामातील एका सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध जबरदस्त विजय मिळवला होता. हा सामना मुंबईला प्लेऑफ्ससाठी पात्र होरण्यासाठी खूप महत्त्वाचा होता. मुंबईला प्लेऑफ्ससाठी पात्र होण्यासाठी या सामन्यात अवघ्या १४.३ षटकांत १९० धावांची गरज असताना मुंबईने एमआयने वेळेत लक्ष्य गाठले. कोरी अँडरसनच्या ४४ चेंडूत ९५ धावांची स्फोटक खेळीने मुंबईच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर आदित्य तरेने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराने अशक्यप्राय गोष्ट शक्य करून मुंबईच्या विजयावर कळस चढवला. हा रोमांचक सामना आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम धावांच्या पाठलागांपैकी एक होता.

हेही वाचा – NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ

५. भारत विरुद्ध इंग्लंड सहावा एकदिवसीय सामना, २००२

या सामन्यात इंग्लंडने शानदार पुनरागमन करत भारताचा ५ धावांनी पराभव करत मालिका ३-३ अशी बरोबरीत राखली. मार्कस ट्रेस्कोथिकच्या ९५ धावांचे दमदार योगदान आणि अँड्र्यू फ्लिंटॉफच्या महत्त्वपूर्ण ४० धावांच्या जोरावर इंग्लंडने भारतापुढे २५५ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. सुरुवातीच्या खराब सुरुवातीनंतर भारताचा डाव वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांनी सावरला. यानंतर विजयाच्या मार्गावर चाललेल्या भारताला गांगुलीच्या विकेट्सनी मोठा धक्का बसला. कारण गांगुली बाद झाल्यानंतर इंग्लंडने जोरदार पुनरागमन केले. फ्लिंटॉफने अंतिम षटकात चमकदार गोलंगदाजी करत एक रनआऊट आणि जवागल श्रीनाथला आऊट करून सामना जिंकून दिला. या विजयानंतर अँड्र्यू फ्लिंटॉफने शर्ट काढून सेलिब्रेशन केले होते. यानंतर सौरव गांगुलीने इंग्लंडमध्ये जाऊन विजय मिळवल्यानंतर शर्ट काढून सेलिब्रेशन करत चौख प्रत्युत्तर दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Among the many exciting matches played at wankhede stadium these five are very special vbm