उंच उडी मारून टाकलेली सव्र्हिस.. बोटांच्या नजाकतीद्वारे केलेले पासिंग.. हवेत उडी मारून मारलेला स्मॅश.. नेटजवळचा थरार.. प्रत्येक गुण मिळवल्यानंतर मिळणारी प्रेक्षकांची दाद.. यामुळे छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम थरार रंगला. अमरावती, पुणे आणि नागपूर संघांनी आपल्या वर्चस्वाची झलक दाखवत छत्रपती शिवाजी चषकावर नाव कोरले.
१८ वर्षांखालील मुलांच्या गटात अमरावतीने कोल्हापूरचे आव्हान २६-२४, २५-२०, २२-२५, २५-१८ असे मोडीत काढले. १८ वर्षांखालील मुलींच्या गटात पुण्याला विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला. पाच सेटपर्यंत जवळपास दोन तास रंगलेल्या या अंतिम फेरीच्या सामन्यात पुण्याने नाशिकचा कडवा प्रतिकार २१-१५, २२-२५, २५-२२, २५-१७, १५-११ असा परतवून लावला. २१ वर्षांखालील मुलींच्या गटात नागपूर संघाने पुण्याला सहज हरवले. नागपूरने हा सामना २५-१९, २५-२१, २५-२० असा खिशात टाकला.
१८ वर्षांखालील मुलींचा सामना अटीतटीचा झाला. प्रत्येक गुणासाठी दोन्ही संघांनी जोरदार संघर्ष केला. त्यामुळे पहिल्या सेटमध्ये २४-२४ अशी स्थिती होती. अखेर अमरावतीने दोन गुण मिळवून पहिला सेट आपल्या नावावर केला. दुसरा सेटही तितकाच थरारक झाला. पण अखेर अमरावतीने २५-२० अशी बाजी मारली. तिसरा सेट जिंकून कोल्हापूरने सामन्यात रंगत आणली. मात्र चौथ्या सेटमध्ये त्यांना आपल्या खेळात सातत्य राखता न आल्यामुळे अमरावतीने हा सेट जिंकून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अमरावतीकडून शुभम तेलगोटे आणि सय्यद नावेद यांनी चांगला खेळ केला. कर्णधार सय्यदने या विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला दिले.
अमरावती, पुणे, नागपूर अजिंक्य
उंच उडी मारून टाकलेली सव्र्हिस.. बोटांच्या नजाकतीद्वारे केलेले पासिंग.. हवेत उडी मारून मारलेला स्मॅश.. नेटजवळचा थरार.. प्रत्येक गुण मिळवल्यानंतर मिळणारी प्रेक्षकांची दाद.. यामुळे छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम थरार रंगला.
First published on: 02-04-2013 at 03:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati pune nagpur win volleyball competition