Virat Kohli Completes 15 Years In International Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने १८ ऑगस्ट २००८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गेल्या शुक्रवारी (१८ ऑगस्ट २०२३) विराटने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला १५ वर्षे पूर्ण केली. या खास प्रसंगी, अनेकांनी कोहलीचे अभिनंदन केले, ज्यामध्ये चाहते, माजी आणि सहकारी खेळाडू उपस्थित होते. दुसरीकडे, किंग कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहलीनेही आपल्या लहान भावासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
विकास कोहलीने इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचा एक फोटो शेअर केला असून, त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने भावनिक गोष्टी लिहिल्या आहेत. विकास कोहलीने कॅप्शनमध्ये लिहिले, “एक मुलगा ज्याने एक स्वप्न पाहिले होते… आणि ते साध्य करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले… सतत स्वत:ला घासणे… पडणे, अपयशी होणे पण पुन्हा उठणे आणि पुन्हा लढणे…. तरी प्रवास सुरूच आहे… भावा तुझा अभिमान आहे.… आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन… लढत राहा… चमकत राहा.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, स्वतः विराट कोहलीने देखील त्याच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्याने टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याचा फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना कोहलीने लिहिले की, “सदैव कृतज्ञ.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराट कोहली १५ वर्षांची कारकीर्द –
विराट कोहली भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत १११ कसोटी, २७५ एकदिवसीय आणि ११५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने १८७ कसोटी डावांमध्ये त्याने ४९.२९च्या सरासरीने ८६७६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने २९ शतके आणि २९ अर्धशतके केली आहेत.
याशिवाय, एकदिवसीय सामन्यांच्या २६५ डावांमध्ये त्याने ५७.३२च्या सरासरीने १२८९८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ४६ शतके आणि ६५ अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर, टी-२० आंतरराष्ट्रीय १०७ डावांमध्ये ५२.७३ च्या सरासरीने आणि १३७.९६ च्या सरासरीने ४००८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने १ शतक आणि ३७ अर्धशतके केली आहेत.