भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा नेहमीच अतितटीचा आणि लढाईपूर्णच असतो असे मत १९ वर्षाखालील भारतीय संघाला आशिया चषक जिंकून देणाऱया कर्णधार विजय झोलने व्यक्त केले आहे.
कर्णधार विजय झोल (१००) आणि संजू सॅमसन (१००) यांच्या शानदार शतकांच्या बळावर भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४० धावांनी मात केली आणि युवा (१९ वर्षांखालील) आशिया चषक विजेतेपदावर नाव कोरले. विजय झोल म्हणतो, “पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्रत्येक चेंडू हा एखादी लढाईच सुरू असल्याचे भासवत असतो. त्यामुळे या लढाईत विजय प्राप्त करणे तितकेच महत्वाचे आणि प्रतिष्ठेचे ठरते. वर्षानुवर्षे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्रेक्षकांची अलोट गर्दी असते आणि तितकाच अभुतपूर्व सामनाही दोघांमध्ये रंगतो.” असेही विजय झोल म्हणाला.
झोलने १२० चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांसह आपली शतकी खेळी साकारली, तर सॅमसनने फक्त ८७ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ४ षटकारांनिशी आपली खेळी उभारली. त्यामुळे भारताला ५० षटकांत ३१४ धावांचे आव्हान उभारता आले होते. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानला ९ बाद २७४ धावा करता आल्या. त्यांच्या कमरान गुलामने ८९ चेंडूंत १२ चौकारांसह नाबाद १०२ धावा केल्या. गेल्या वर्षीही भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ अंतिम फेरीत आमनेसामने होते. त्यावेळी हा सामना टाय झाल्यामुळे आशिया चषकात दोन्ही संघ संयुक्त विजेते झाले होते. मात्र, यावेळी भारतीय संघाने पाकिस्तान संघाला चोख प्रत्युत्तर देऊन भारतीय संघाने ‘विजय’च्या नेतृत्वाखाली विजय प्राप्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा