आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविण्याची क्षमता असणारे नैपुण्य भारतात विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र त्यांची कारकीर्द घडविण्यासाठी पालकांकडून सकारात्मक प्रोत्साहनाची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले आहे आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटू व प्रशिक्षिका राधिका तुळपुळे-कानिटकर यांनी.
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या तृतीय श्रेणी प्रशिक्षकाचा दर्जा मिळविणाऱ्या राधिका या एकमेव भारतीय महिला प्रशिक्षक आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारतीय कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. राधिका यांनी राष्ट्रीय ग्रासकोर्ट स्पर्धेचे जेतेपद पटकावले असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये त्यांनी अव्वल दर्जाचे यश मिळविले आहे. देशातील महिला टेनिसच्या प्रगतीविषयी त्यांनी ‘लोकसत्ता’शी मारलेली ही बातचीत-
भारतात गेल्या दशकामध्ये स्पर्धाची संख्या वाढली आहे, पुरस्कर्त्यांचीही संख्या वाढली आहे तरीही महिला टेनिसबाबत अपेक्षेइतकी प्रगती दिसत नाही. त्याबाबत काय सांगता येईल?
महिला टेनिसमध्ये अपेक्षेइतकी प्रगती झालेली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यामुळेच चाळिशीकडे झुकलेल्या रश्मी चक्रवर्तीवर भारताला ऑलिम्पिकमध्ये सानिया मिर्झाची जोडीदार म्हणून अवलंबून राहावे लागते. पुण्यात मी एनईसीसी करंडक स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये एकही भारतीय महिला अव्वल दर्जाचे यश मिळवू शकलेली नाही. महिलांच्या टेनिसपटूंबाबत मर्यादा असतात, मात्र पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. टेनिसची कारकीर्द ही किमान दहा-बारा वर्षे होऊ शकते. त्यामुळे टेनिसपटूंना अल्प
यशावर समाधान मानण्यास सांगू नये.
अनेक वेळा पालक मुलांकडून झटपट यश अपेक्षित करतात. त्यामुळे खेळाडूंवर अनिष्ट परिणाम होतो का?
हो, नक्कीच. हातात रॅकेट पकडल्यावर आपल्या मुलाने विजेतेपद मिळविले पाहिजे, ही पालकांची मानसिकता असते. आजकाल पाचव्या वर्षांपासून मुले टेनिस खेळावयास सुरुवात करतात. कारकिर्दीच्या दृष्टीने ही स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र पाच ते आठ वर्षांपर्यंत या खेळाडूंना खेळाचा निखळ आनंद घेऊ द्यावा. त्यामुळे ते खेळाचा आनंद घेत त्यामधील बारकावे सहजपणे आत्मसात करू शकतात. एरवी पिवळ्या रंगांच्या चेंडूंबरोबरच अन्य रंगांचे चेंडू प्रशिक्षणासाठी वापरण्याची पद्धत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचलित झाली आहे. आपल्याकडेही काही ठिकाणी ही पद्धत सुरू झाली आहे. नवोदित खेळाडूंना नेहमीचे चेंडू खूप जड जातात. त्याऐवजी अन्य रंगांचे हलक्या वजनाचे चेंडू वापरले जातात. त्यामुळे नवोदित खेळाडू रॅली करायला शिकतात. रॅलीबाबत परिपक्वता आली की परतीचे फटके मारणे आणि परतविणे सोपे जाते.
खेळाडू म्हणून यशस्वी कारकीर्द घडवल्यानंतर प्रशिक्षक म्हणून काम करताना व्यावसायिक प्रशिक्षकाच्या तुलनेत काही फायदा होतो का?
हो. व्यावसायिक प्रशिक्षक अव्वल दर्जाचे असतात. मात्र खेळाडू म्हणून यशस्वी कारकीर्द घडवल्यानंतर प्रशिक्षक म्हणून काम करताना स्पर्धात्मक खेळाच्या अनुभवाचा खूप फायदा होतो. विशेषत: निर्णायक सेटमध्ये महत्त्वाच्या क्षणी खेळातील बारकावे समजावून सांगणे शक्य होते. प्रशिक्षण देताना मला माझ्या कारकिर्दीतील विविध सामन्यांच्या अनुभवांची शिदोरी खूपच उपयुक्त ठरली आहे.
टेनिस क्षेत्रात खेळाडू व प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिका करताना काय बदल जाणवत आहेत?
खेळात व्यावसायिकता आली आहे. मात्र खेळाचा आत्मा हरवत चालला आहे, याची जाणीव प्रकर्षांने दिसून येऊ लागली आहे. हल्लीच्या खेळाडूंमध्ये मनापासून शिकण्याची इच्छा दिसून येत नाही व खेळाचा निखळ आनंद घेण्याची वृत्ती दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचा विकास खुंटत आहे.
महिला टेनिसपटूंनी समृद्ध कारकीर्द घडवण्यासाठी काय केले पाहिजे?
टेनिसमध्ये सर्वागीण तंदुरुस्तीला अतिशय महत्त्व आहे. खेळाडूंना क्रीडा मानसतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, फिटनेस ट्रेनर, पुरस्कर्ते आदी अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा फायदा घेताना तांत्रिक ज्ञान व कल्पकतेची जोड देण्याची आवश्यकता आहे. तसे केल्यास अव्वल दर्जाचे यश तुमच्या पायाशी लोळण घेऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा