चीनच्या लिरेन डिंगसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी
माजी विश्वविजेता आणि गतविजेत्या भारताच्या विश्वनाथन आनंदला बिलबाओ मास्टर्स अंतिम बुद्धिबळ स्पध्रेचे जेतेपद राखण्यात अपयश आले. पाचवेळा बरोबरी आणि एका सामन्यातील पराभवामुळे त्याला चीनच्या लिरेन डिंगसह संयुक्तरीत्या तिसरे स्थान मिळाले. आनंदला सहाव्या आणि अंतिम सामन्यात डिंगविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या वेस्लेय सो याने जेतेपद पटकावले.
चार खेळाडूंमधील या अव्वल दुहेरी साखळी स्पर्धेत आनंदने सहा डावांपैकी पाच डाव बरोबरीत ठेवले, तर एका डावात त्याला पराभव स्वीकारावा लागला. आनंदला पाचव्या डावात नेदरलँडच्या अनिश गिरीने पराभवाचा धक्का दिला होता.
वेस्लीने शेवटच्या डावात अनिश गिरी याला बरोबरीत रोखले. शेवटच्या फेरीअखेर वेस्ली व गिरी यांचे प्रत्येकी आठ गुण झाले. त्यामुळे टायब्रेकर डावांचा उपयोग करण्यात आला. त्यामध्ये वेस्ली याने १.५-०.५ असा विजय मिळविला आणि विजेतेपदावर मोहोर उमटवली.
आनंदविरुद्धच्या डावात डिंगला पांढऱ्या मोहरांनी खेळताना वरचष्मा राखण्याची संधी होती. त्याने इंग्लिश ओपनिंगचा उपयोग केला, परंतु आनंदने त्याला चोख उत्तर दिले. वजिरावजिरी झाल्यानंतर आनंदने अपेक्षेइतक्या प्रभावी चाली केल्या नाहीत. डावाच्या शेवटी दोन्ही खेळाडूंकडे विरुद्ध रंगांचे उंट होते. डावातील गुंतागुंत वाढल्यामुळे अखेर
६९ व्या चालीला दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली. या सामन्यात आंनदचे पारडे जरी जड वाटत असले तरी त्याला डिंगला नमवण्यात अपयश आले.
वेस्लीविरुद्धच्या डावात गिरीने सेमी स्लाव्ह डिफेन्स तंत्राचा उपयोग केला. डावाच्या मध्यास दोन्ही खेळाडूंनी बरोबरीच्या दृष्टीनेच डावपेच केले. केवळ ३४ व्या चालीस बरोबरी मान्य करण्यात आली. टायब्रेकरमधील पहिल्या डावात गिरी याने केलेल्या अक्षम्य चुकांचा फायदा घेत वेस्ली याने विजय मिळविला. पाठोपाठ त्याने दुसऱ्या डावात बरोबरी स्वीकारली.

Story img Loader