|| तुषार वैती

आठवडय़ाची मुलाखत: अनंता चोपडे, आंतरराष्ट्रीय बॉक्सर

इंडोनेशिया येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या प्रेसिडेंट चषक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला असून आता जागतिक आणि ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे माझे ध्येय आहे, अशी भावना बॉक्सर अनंता चोपडे याने व्यक्त केली. बुलढाणा जिल्ह्य़ातील चिखली तालुक्यातील सावना गावच्या अनंताने गेल्या आठवडय़ात देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवला. गेल्या वर्षी पुण्यात झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या अनंता चोपडे याने विजयी घोडदौड कायम राखत ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. अकोल्यातील राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीचा विद्यार्थी असलेल्या अनंताशी सुवर्णपदकानंतर केलेली ही बातचीत-

  • बुलढाणा ते इंडोनेशियातील बॉक्सिंग स्पर्धेच्या विजेतेपदापर्यंतचा प्रवास कसा होता?

घरची परिस्थिती फारच बिकट असल्यामुळे आई-वडील स्वत:च्या शेतीसह दुसऱ्यांच्या शेतातही दिवसरात्र राबत असतात. मोठा भाऊ रिक्षा चालवत असला तरी कुटुंबातील पाच जणांचा खर्च भागवणे म्हणजे तारेवरची कसरत असते. शाळेत असताना अकोल्यातील क्रीडा प्रबोधिनीसाठी माझी निवड झाल्यानंतर कैलाश सरवंदे यांनी माझ्यातील शारीरिक कौशल्य पाहून मला बॉक्सिंग खेळण्याचा सल्ला दिला. वयाच्या सहाव्या वर्षी पहिली राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्यानंतर कनिष्ठ गटातच कोलकातामध्ये पहिल्या राष्ट्रीय सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यानंतर मी मागे वळून पाहिलेच नाही. क्रीडा प्रबोधिनीचे मुख्य प्रशिक्षक सतीशचंद्र भट सरांनी माझ्या तांत्रिक खेळावर भर दिला. त्यांच्यामुळेच माझे कौशल्य विकसित होत गेले.

  • १२वीची परीक्षा सुरू असतानाच तू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला होतास, तो प्रसंग कसा होता?

औरंगाबाद येथील भारतीय युवा संघाच्या सराव शिबिरासाठी माझी निवड झालेली असतानाच, वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी कसून तयारी सुरू होती. दररोज तीन तास कोर्टवर घाम गाळत होतो. स्पर्धेदरम्यानच माझी १२वीची परीक्षा सुरू झाली. पण माझे बॉक्सिंगवरील प्रेम आणि गुणवत्ता पाहून मुख्य प्रशिक्षक मनोहरम सरांनी मला परीक्षेऐवजी स्पर्धेत उतरण्याचा सल्ला दिला. सर्व प्रतिस्पध्र्याना धूळ चारत मी सुवर्णपदकावर नाव कोरले.

  • इंडोनेशियातील प्रेसिडेंट चषक स्पर्धेसाठी कशी तयारी केली होतीस?

गेले सात महिने मी पतियाळातील राष्ट्रीय क्रीडा संस्थेमध्ये कसून सराव करत होतो. अनेक निवड चाचणी स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करूनही कुठे तरी कमी पडत होतो. मातब्बर खेळाडूंना निवड चाचणीत हरवूनही भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळत नव्हती. पण कुटप्पा सरांनी माझ्यातील गुणवत्ता अचूक हेरली होती. त्यांनी मला या स्पर्धेसाठी संधी देण्याचे ठरवले. भारतीय संघात पहिल्यांदा संधी मिळाल्यानंतर मी संधीचे सोने करण्याचे ठरवले. त्यासाठी रविवारीही सरावासाठी दांडी मारली नाही. अशी संधी पुन्हा मिळणार नाही, याच उद्देशाने सर्व प्रतिस्पध्र्यावर लीलया वर्चस्व गाजवायचे, हाच निर्धार केला होता.

  • मातब्बर प्रतिस्पध्र्यावर मात करून सुवर्णपदकापर्यंत झेप घेतल्यावर आता काय भावना आहेत?

पहिल्याच फेरीत इंडोनेशियाच्या आघाडीच्या खेळाडूचे आव्हान माझ्यासमोर होते. सुरुवातीला थोडासा मार खाल्ल्यानंतर मी त्याच्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्यानंतर दुसऱ्या लढतीतही इंडोनेशियाच्या खेळाडूला ५-० असे हरवत मी आगेकूच केली. परदेशातल्या अव्वल खेळाडूंशी दोन हात करताना त्यांचा तांत्रिक खेळ, शैली याचा अभ्यास करत होतो. पण सध्याचे भारताचे प्रशिक्षक गिरीश पवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या पवार यांचेच मला मध्य रेल्वेकडून खेळताना मार्गदर्शन मिळते. सहा वेळा जगज्जेतेपद पटकावलेल्या एमसी. मेरी कोमनेही माझा आत्मविश्वास उंचावला. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूला हरवल्यानंतर अंतिम फेरीत अफगाणिस्तानच्या रेहमानी रमीशवर ५-० असे निर्विवाद वर्चस्व गाजवले. सुवर्णपदकावर नाव कोरल्यानंतर माझा स्वत:वरच विश्वास बसत नव्हता.

  • यापुढे कोणते ध्येय साध्य करायचे आहे?

पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला आहे. यापुढेही कामगिरीत सातत्य राखून मला देशाचे आणि स्वत:चे नाव अधिक उंचवायचे आहे. जागतिक तसेच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणे हे माझे ध्येय आहे. टोक्यो ऑलिम्पिकसाठी जर निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली तर यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करण्याचा मी प्रयत्न करीन.

Story img Loader