गुरुनाथ मयप्पनला अटक होईपर्यंत मुंबई पोलिसांचा जीव टांगणीला लागला होता. कारण त्याच्या शोधासाठी चेन्नईला गेलेल्या पोलीस पथकाला रिक्त हस्ते परतावे लागले होते. मयप्पन भूमिगत होण्याची किंवा अटकपूर्व जामीन घेण्याचीही भीती पोलिसांना होती. मात्र आपली केवळ चौकशी होईल अशा विचारात मुंबईत आलेल्या गुरुनाथला पोलिसांनी अखेर मोठय़ा चातुर्याने अटक केली.
मयप्पन हा बीसीसीआय अध्यक्षांचा जावई आणि चेन्नई सुपर किंग संघाचा मालक होता. त्यामुळे त्याला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा केले होते. समन्स देण्याच्या निमित्ताने पोलीस उपायुक्त आणि तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे पथक चेन्नईला गेले होते. गुरुनाथ तेथे सापडला नाही. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली होती. त्याच्यावर समन्स बजावल्यानंतरही तो हजर झाला नसता, तर पोलिसांना पुढची कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी आणखी काही दिवस लागले असते. दरम्यानच्या काळात भूमिगत होऊन तो अटकपूर्व जामीन घेण्याची शक्यता होती. त्याला शुक्रवारी मुंबई गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. तो येईलच याची शाश्वती नव्हती. पण गुरुनाथ मुंबईला येणार असल्याची माहिती मुबंई पोलिसांना प्रसारमाध्यमातूनच मिळाली. ताबडतोब पोलिसांनी गुन्हे शाखा युनिट-८ला कामाला लावले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे आणि त्यांच्या पथकांनी विमानतळावर सापळा लावला. गुरुनाथ आपला मित्र जॉय ल्युकसच्या खाजगी विमानाने दुपारी ४.५० वाजता मधुरा येथून निघाला. शुक्रवारी ७ वाजून ४० मिनिटांनी तो विमानतळावर उतरताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला घेरले. अनपेक्षितरीत्या पोलिसांना पाहून तो चरकला. आपण गुन्हे शाखेकडे जबाब नोंदवायला येत असल्याचे त्याने सांगितले. मयप्पन विमानतळावर उतरून रात्रीच्या न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामीन घेण्याची किंवा वकिलामार्फत आधीच उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्वत:चा बचाव करण्याची शक्यता होती.
प्रश्नांच्या भडिमारामुळे गुरुनाथने पाणी मागितले
खबरदारीचा उपाय म्हणून गुरुनाथने वकील राजन आणि जॉन्सनला सोबत आणले होते. पण वकील आणि या मित्राला पोलिसांनी खालीच बसवून ठेवले. सहपोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गुरुनाथवर प्रश्नांचा भडिमार केला. आपल्याला ‘विशेष’ वागणूक मिळेल अशी त्याची अपेक्षा होती. पण त्याची घोर निराशा झाली. प्रसारमाध्यमातील बातम्यांमुळे पोलीस काय विचारतील, याची त्याला कल्पना होती. त्याने तशी तयारी करून ठेवली होती. सुरुवातीला तो ठामपणे उत्तरे देत होता. पण नंतर पोलिसांपुढे तो गडबडू लागला. दोन वेळा त्याने घशाला कोरड पडली म्हणून पाणी मागितले. गुरुनाथला मराठी चांगले समजत होते. परंतु तो पोलिसांशी इंग्रजीतून बोलत होता.
अय्याश गुरुनाथ
अटकेत असेलला अभिनेता विंदू याने दिलेल्या माहितीत आणि गुरुनाथच्या चौकशीतून गुरुनाथच्या विलासी आणि अय्याशी व्यक्तिमत्वावर प्रकाश पडत आहे. गुरुनाथला मुलींचा प्रचंड नाद होता आणि हा शौक पूर्ण करण्याची जबाबदारी त्याचा मित्र विंदू दारा सिंग यथोचीत पार पाडायचा. मुंबईत निवासासाठी गुरुनाथ जेव्हा हॉटेलात यायचा, तेव्हा विंदू त्याची खास व्यवस्था ठेवायचा. हवाई सुंदरी, मॉडेल्स, आणि सहाय्यक अभिनेत्री विंदू पाठवायचा. विंदूची बॉलिवूड आणि ‘पेज-थ्री’ वर्तुळामध्ये ऊठबस होती. त्यामुळे तो सावज हेरून मित्राची आवड पूर्ण करायचा. गुरुनाथ या मुलींना महागडय़ा भेटवस्तू, बॅ्रन्डेड ज्वेलरी, महागडे फोन द्यायचा.
विंदूनेच गुरुनाथला सट्टेबाजीचा नाद लावला
विंदूने सुरुवातीला मला २५ लाख रुपये जिंकायची संधी दिली. मला सट्टेबाजीच्या जाळ्यात त्याने पूर्णपणे अडकवले. नंतर मग मी सट्टेबाजीत बराच पैसा हरलो, असे गुरुनाथने चौकशीत सांगितल्याचे समजते.