‘जिथे पिकते, तिथे विकत नाही’ असे म्हणतात. आपल्या भागातील एखाद्या गोष्टीचे महत्त्व आपल्यालाच नसल्याची खंत यात परखडपणे मांडली आहे. असेच काहीसे आहे ते सिंधुदुर्गातील जलतरणाचे. सिंधुदुर्गला समुद्रकिनाऱ्यांची निसर्गदत्त देणगी लाभलेली, पण इकडची मुले फक्त हौस म्हणून समुद्रात डुंबायला उतरायची, पण त्यापुढचा विचार मात्र कुणाचा नव्हता. आपण स्वत: जलतरणपटू आणि प्रशिक्षक म्हणून काही खेळाडू घडवूनही आपल्या भागातच खेळाडू न घडवू शकल्याची खंत राजेंद्र पालकर यांच्या मनात होती. चार वर्षांपूर्वी त्यांनी मालवणातील चिवला समुद्रकिनारी जलतरण शर्यतीचे आयोजन करायला सुरुवात केली आणि या वर्षी चक्क हजारांपेक्षा अधिक स्पर्धक त्यांना लाभले, तर जिल्ह्य़ामध्ये आतापर्यंत जवळपास ६५ जलतरणपटू तयार झाले आहेत.
‘‘सिंधुदुर्गामध्ये चार वर्षांपूर्वी जलतरणाला महत्त्व नव्हते, मुळात स्पर्धाच नव्हत्या. आता ही स्पर्धा नियमित होऊ लागली असून ती बहरायला हवी, अजून आम्हाला बराच पल्ला गाठायचा आहे. यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक हवेत. आता वेंगुर्ला आणि सावंतवाडीमध्ये जलरतण तलाव आहेत, पण चांगले प्रशिक्षक नाहीत. चांगल्या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ामध्ये जलतरणासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यामुळे खेळाचा प्रचार आणि प्रसार झाला आहे, पण त्यांना निधीचा प्रश्न सतावत असून सरकारने पुढे येऊन त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे,’’ असे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे सचिव किशोर वैद्य यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर म्हणाले की, ‘‘मी जलतरणपटू होतो, रुपाली रेपाळेसारखे खेळाडूही घडवले, पण कोकणात मला काहीच करता आले नव्हते. त्यासाठी मी या स्पर्धेचे आयोजन केले, या स्पर्धेमुळे आता सिंधुदुर्गामध्ये ६५ जलतरणपटू तयार झाले आहेत, त्यांची कामगिरीही चांगली असून यामधून आम्हाला राष्ट्रीय खेळाडू घडवायचे आहेत. ओरसचा तलाव आम्ही सुधारला. तिथे आता जवळपास ५० खेळाडू सराव करतात, काही सावंतवाडीमध्ये आहेत. वेंगुल्र्याच्या तलावाचे लवकरच उद्घाटन होईल, मालवणमध्ये आता तलाव बनतोय, त्यामुळे आता आम्ही जलतरणाचा दमदार पाया रचला आहे. ‘सर्व सोंगे आणता येतात, पण पैशाचे नाही’, त्यासाठी सरकारने मदत करणे गरजेचे आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘या स्पर्धेला उणीव भासत आहे ती स्वयंसेवकांची तसेच स्थानिक प्रशासन व रहिवाशांच्या मदतीची. अंतर्गत राजकारणामुळे या वर्षी आयोजकांना वीसऐवजी चारच बोटी मिळाल्या, हे असेच घडले तर स्पर्धा बहरणार नाही. पण सध्याची स्थिती ही नक्कीच सकारात्मक आहे. या स्पर्धेमुळे कोकणातले खेळाडू राष्ट्रीय दर्जावर गेले तरच या प्रयत्यांचे खरे फलित ठरेल.’’
या उपक्रमात महाराष्ट्र क्रीडा विकास संस्था गेली चार वष्रे पुढाकार घेत आहे. या संस्थेचे कार्यवाह बाळ वाडवलीकर यांनी सांगितले की, ‘‘प्रत्येक खेडय़ातला मुलाला खेळता यावे, हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे सरकारवर अवलंबून न राहता त्यांची धोरणे लोकापर्यंत राबवण्याचे आम्ही काम करतो. महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थेची स्थापना करताना कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांची कल्पना आम्ही रुजवण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, त्यानंतर नाशिक, अहमदनगरमध्ये आता ही संस्था फोफावत आहे. आता सिंधुदुर्ग जिल्हा आणि राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सहभागी होऊ लागला आहे. या सागरी स्पर्धेमुळे जलतरणासाठी पोषक वातावरण निर्मिती होत आहे.’’
खासदारांचे ठोस आश्वासन नाहीच!
मालवणात एवढी भव्य स्पर्धा होत असली तरी स्थानिक खासदार नीलेश राणे या वर्षी पहिल्यांदाच स्पर्धेला आले, त्यांनी स्पर्धेचे कौतुकसुद्धा केले, पण मदतीबद्दल ठोस कोणतेच आश्वासन दिले नाही. ही स्पर्धा राज्यस्तरीय असली तरी अन्य राज्यांतून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काही वर्षांमध्ये ही स्पर्धा राष्ट्रीय दर्जाची होऊ शकते.
..आणि सिंधुदुर्गमध्ये जलतरणपटू घडू लागले!
‘जिथे पिकते, तिथे विकत नाही’ असे म्हणतात. आपल्या भागातील एखाद्या गोष्टीचे महत्त्व आपल्यालाच नसल्याची खंत यात परखडपणे मांडली आहे.
First published on: 26-12-2013 at 01:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: And the swimmer happened in sindhudurg