भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका १ ऑगस्टपासून सुरु होते आहे. मात्र या मालिकेआधीच इंग्लंडच्या खेळाडूंनी भारतीय कर्णधार विराट कोहलीवर दबाव आणायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने एक वक्तव्य करुन विराट खोटं बोलत असल्याचं म्हटलं होतं. त्याच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी अँडरसनला बालीश म्हणलं आहे.

अवश्य वाचा – विराटचा दावा तथ्यहीन!

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत असताना शिवरामकृष्णन यांनी विराट कोहलीला पाठींबा दिला. “प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधारपदाला मालिका सुरु होण्याआधी लक्ष्य करायचं आणि त्याचं चित्त विचलीत करायचं ही जुनी पद्धत झाली. एकदा कर्णधार अपयशी ठरला तर त्याचा परिणाम संपूर्ण संघावर होतो. कोणत्या खेळाडूला धावा काढलेल्या आवडणार नाहीत. अँडरसनही शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो, पण तोही संघासाठी धावा काढतोच. विराटही अधिकाधीक धावा करण्याचा प्रयत्न करेल, मात्र त्याच्या धावांऐवजी संघाच्या कामगिरीला अधिक महत्व दिलं तर वावगं काय आहे? अँडरसनचं हे वक्तव्य निव्वळ बालीश आहे.” अशा शब्दांमध्ये शिवरामकृष्णन यांनी भारतीय कर्णधाराची पाठराखण केली.

भारतीय कर्णधार विराट कोहलीने जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक मैदानावर खोऱ्याने धावा बनवल्या आहेत. मात्र, इंग्लंडमधील खेळपट्टय़ांवर विशेषत: लाल चेंडूसमोर कोहली नेहमीच अपयशी ठरतो, असेच चित्र आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे, संघ जिंकत असल्यास स्वत:च्या धावा होणे किंवा न होण्याने काहीही फरक पडत नाही असे म्हणणे म्हणजे एकप्रकारे सत्य नाकारणे आहे, असा आरोप इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने केला होता. २०१४च्या कसोटी मालिकेत कोहलीने पाच सामन्यांत मिळून अवघ्या १३४ धावा बनवल्या होत्या. त्याशिवाय ३५ वर्षीय अँडरसनने त्या दौऱ्यात कोहलीला अनेकदा आपल्या तालावर नाचवून सहा डावांपैकी चार वेळा त्याला बाद केले होते.

Story img Loader