विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने रशियाच्या पीटर स्विडलरविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली आणि अल्खाइन स्मृती बुद्धिबळ स्पध्रेच्या आठव्या फेरीअखेर संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. स्विडलरने सामना बरोबरीत सोडविण्याची सोपी संधी सोडली नाही.
फ्रान्सचा मॅक्झिम व्हॅचिअर-लाग्राइव्ह विजेतेपदासाठी कडवा दावेदार मानला जात होता. पण तो स्पध्रेत प्रथमच पराभूत झाला. रशियाच्या निकिता व्हिटुइगोव्हने त्याचा अनपेक्षितरीत्या पराभव केला. व्हॅचिअर-लाग्राइव्हच्या पराभवाचा फायदा झाला तो इस्रायलच्या बोरिस गेलफंडला. त्याने आठव्या फेरीत इस्रायलच्याच व्लादिमिर क्रामनिकविरुद्धची लढत बरोबरीत राखून सर्वाधिक पाच गुणांसह एकटय़ाने आघाडी टिकवली आहे.
आता स्पध्रेची शेवटची फेरी बाकी असून, विजेतेपदाची चुरस वाढली आहे. गेलफंड सध्या जरी आघाडीवर असला तरी अखेरच्या फेरीत त्याची गाठ पडणार आहे ती भारताच्या विश्वनाथन आनंदशी. गतवर्षी मार्च महिन्यात मॉस्को येथे झालेल्या विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पध्रेत आनंदने गेलफंडचा पराभव केला होता. तथापि, व्हॅचिअर-लाग्राइव्ह, आनंद, मायकेल अ‍ॅडम्स आणि लिव्हॉन अरोनियन हे साडेचार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

Story img Loader