West Indies vs England 5 match T20 series: क्रिकेट वेस्ट इंडिजबोर्डाने रविवारी इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. ३५ वर्षीय अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचा टी-२० आंतरराष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आहे. दोन वर्षांनंतर तो वेस्ट इंडीजच्या संघात परतला आहे. या कॅरेबियन हिटमॅनने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळला होता. १३ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेत रोव्हमन पॉवेल कॅरेबियन संघाचे नेतृत्व करेन. यष्टिरक्षक फलंदाज शाई होपला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

रसेल विस्फोटक फलंदाजी करू शकतो

आंद्रे रसेल हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना रसेलने अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. यात १३ चेंडूत ४८ धावांच्या नाबाद खेळीचा समावेश आहे. याशिवाय ३६ चेंडूत ८८ धावा ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी आहे. त्याने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्रिनबागो नाइट रायडर्ससाठी ४० चेंडूत शतक झळकावले आहे. त्यानंतर त्याने ४९ चेंडूत १२१ धावांची नाबाद खेळी केली. जमैका तल्लावाहविरुद्धच्या सामन्यात रसेलने हॅटट्रिकही घेतली होती.

पूरन आणि होल्डर देखील परतले

आंद्रे रसेल व्यतिरिक्त निकोलस पूरन आणि जेसन होल्डर यांचा १५ जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे, ज्यांना इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. एकदिवसीय मालिकेत तीन सामन्यांत चार विकेट्स घेणारा अष्टपैलू गोलंदाज गुडाकेश मोतीचाही पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, ५० षटकांच्या मालिकेत पाच विकेट्स घेणाऱ्या रोमॅरियो शेफर्डचाही संघाच्या यादीत समावेश झाला आहे.

हेही वाचा: WTC: बांगलादेशच्या पराभवाने पाकिस्तान अव्वल स्थानी; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठे बदल, जाणून घ्या भारताची स्थिती

संघाची घोषणा करताना, क्रिकेट वेस्ट इंडिजचे मुख्य निवडकर्ते डेसमंड हेन्स म्हणाले की, “वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने २०२४च्या विश्वचषकापूर्वीची ही त्यांची २०२३ वर्षातील शेवटची टी-२० मालिका असेल. पहिला टी-२० सामना बार्बाडोसमध्ये होणार आहे. तर, पुढील दोन सामने ग्रेनाडा येथे होणार आहेत. शेवटचे दोन सामने त्रिनिदादमध्ये होणार आहेत.

हेही वाचा: Hardik Pandya: BCCI सचिव जय शाहांनी दिले हार्दिक पंड्याच्या परतण्याचे संकेत; म्हणाले, “या मालिकेत तो…”

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ: रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड.