केव्हिन पीटरसन याच्या आत्मचरित्रात केलेल्या अनेक आरोपांमुळे इंग्लंड क्रिकेटच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे, अशा शब्दांत इंग्लंडचा माजी कर्णधार अॅन्ड्रय़ू स्ट्रॉसने त्याच्यावर टीका केली आहे.
स्ट्रॉस म्हणाला, ‘‘पुस्तक म्हणून या आत्मचरित्राला भरपूर प्रतिसाद मिळणार आहे, मात्र या पुस्तकात पीटरसनने उल्लेख केलेल्या काही घटनांचा इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक व त्याच्या सहकाऱ्यांवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे.’’
द. आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेप्रसंगी पीटरसनने इंग्लंडचा कर्णधार स्ट्रॉसवर टीका केली होती. या मालिकेनंतर स्ट्रॉसने निवृत्ती स्वीकारली, तर पीटरसनला संघातून डच्चू देण्यात आला होता. इंग्लंडचे गोलंदाज जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड व ग्रॅमी स्वान यांनी संघातील क्षेत्ररक्षकांनी केलेल्या चुकांबद्दल गोलंदाजांची माफी मागितली होती, असे पीटरसन याच्या पुस्तकात म्हटले आहे.