गेल्या वर्षी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत मिळविलेले ऐतिहासिक विजेतेपद म्हणजे चमत्कार नव्हता, हे दाखविण्यासाठीच ब्रिटनचा अँडी मरे यंदा पुन्हा अव्वल कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्याबरोबरच अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच, राफेल नदाल, रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स यांच्या कामगिरीबाबतही उत्कंठा निर्माण झाली असून स्पर्धेला सोमवारीपासून सुरुवात होणार आहे.
गतवर्षी अंतिम लढतीत जोकोव्हिचला मरेकडून पराभूत व्हावे लागले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी जोकोव्हिच उत्सुक आहे.
ग्रँड स्लॅम स्पर्धेत मिळविलेल्या १७ विजेतेपदांपैकी सात विजेतेपद फेडररने विम्बल्डनमध्ये मिळविली आहेत. यंदा त्याला विजेतेपदासाठी प्रामुख्याने नदाल याचाच अडथळा असेल. या दोन खेळाडूंची उपांत्य फेरीत गाठ पडण्याची शक्यता आहे.
मरिओन बाटरेलीने गतवर्षी या स्पर्धेत सनसनाटी विजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेनंतर काही दिवसांनी तिने स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारली. तिच्या अनुपस्थितीत सेरेना विल्यम्स ही विजेतेपदाची मुख्य दावेदार आहे. तिने येथे आतापर्यंत पाच वेळा अजिंक्यपद मिळविले आहे. नुकत्याच झालेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी मारिया शारापोवा या स्पर्धेतही जेतेपदाची दावेदार आहे. मात्र तिच्या मार्गात सेरेनाचा अडथळा असणार आहे. सिमोना हॅलेप हिच्याबाबत अपेक्षा उंचावल्या आहेत. तिने फ्रेंच स्पर्धेत उपविजेतेपदापर्यंत झेप घेतली होती. पेट्रा क्विटोव्हा, अ‍ॅग्निझेस्का रंडवास्का व अ‍ॅना इव्हानोव्हिक यांच्याही कामगिरीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Story img Loader