पराभवाच्या शुक्लकाष्ठामध्ये अडकलेल्या इंग्लंडच्या अँडी मरेने माजी महिला विश्वविजेती अ‍ॅमेली मॉरेस्मोला आपले प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. अँडी मरेच्या सहयोगी संघाने यासंदर्भात रविवारी घोषणा केली. गेल्या वर्षी विम्बल्डन जेतेपद पटकावल्यानंतर मरेच्या कामगिरीत घसरण झालेली पाहण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे २७ वर्षीय मरेसमोर विम्बल्डन जेतेपद राखण्याचे मोठे आव्हान असेल.  
‘‘मॉरेस्मोचे मार्गदर्शन मिळणार असल्याने मी आनंदी आहे. मी नेहमीच तिच्या खेळातून अनेक गोष्टी शिकलो आहे. तिने कारकिर्दीत अनेक आव्हानांना पार करत जेतेपदे पटकावली आहेत. तिचे टेनिसला मोठे योगदान महत्त्वाचे आहे. यापुढे मला आणखी ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकायची आहेत. त्यादृष्टीने मॉरेस्मोची नियुक्ती महत्त्वाची ठरेल,ह्व असे मरेने सांगितले.
मार्चमध्ये ज्येष्ठ प्रशिक्षक इव्हान लेंडल यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर मरे प्रशिक्षकांशिवायच खेळत आहे. लेंडल यांच्या मार्गदर्शनाखाली मरेने ऑलिम्पिक सुवर्णपदक, २०१२ अमेरिकन स्पर्धा आणि २०१३ विम्बल्डन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. फ्रेंच खुल्या स्पर्धेत मरे आणि आंद्रेय गोलुबेव्ह यांच्यातील लढत पाहिल्यानंतर मॉरेस्मो यांनी प्रशिक्षकपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला. कारकिर्दीत सुरुवातीला आईचे मार्गदर्शन लाभलेल्या मरेचा यंदाच्या फ्रेंच खुल्या स्पर्धेतला प्रवास उपांत्य फेरीत नदालच्या झंझावातासमोर संपुष्टात आला.
दरम्यान, मॉरेस्मोने विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदा गवसणी घातली आहे. २०१० साली मॉरेस्मोने मायकेल लॉइड्रा या पुरुष खेळाडूला मार्गदर्शन केले होते. त्यानंतर अव्वल टेनिसपटू व्हिक्टोरिया अझारेन्काचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. मॉरेस्मोच्या मार्गदर्शनाखालीच फ्रान्सच्या मारिओन बाटरेलीने विम्बल्डन जेतेपदाची कमाई केली होती.
‘ग्रास कोर्ट’वरील मार्गदर्शनसाठी मॉरेस्मो प्रसिद्ध असल्याचे म्हटले जात असून आगामी विम्बल्डनसाठी मरेला तिची चांगली मदत होईल, असे म्हटले जात आहे.
‘‘अँडीला मार्गदर्शन करण्यासाठी मी उत्सुक आहे. तो अतिशय गुणवान खेळाडू आहे. त्याच्या कामगिरीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. त्याने आणखी ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवावीत यासाठी मी काम करणार आहे,’’ असे मॉरेस्मोने सांगितले.

Story img Loader