केव्हिन अँडरसनचा खळबळजनक विजय *  रॉजर फेडरर, स्टॅनिसलॉस वॉवरिन्का सुसाट * व्हिक्टोरिया अझारेन्का, सिमोन हालेपची आगेकूच
रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच यांची सद्दी मोडत २०१२ मध्ये अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपद नावावर करणाऱ्या अँडी मरेला यंदा चौथ्या फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे सलग १८ ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये किमान उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा मरेचा विक्रमही मोडला. दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने दिमाखदार खेळाचे प्रदर्शन करताना मरेला गाशा गुंडाळावा लागला. अन्य लढतींमध्ये रॉजर फेडररने जॉन इस्नरला नमवत विजयी वाटचाल कायम केली. महिलांमध्ये व्हिक्टोरिया अझारेन्का, सिमोन हालेप यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले.
१५व्या मानांकित अँडरसनने मरेवर ७-६ (७-५), ६-३, ६-७ (२-७), ७-६ (७-०) असा विजय मिळवला. तब्बल सातवेळा ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये चौथ्या फेरीतच माघारी परतावे लागलेल्या अँडरसनची ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याची पहिलीच वेळ आहे. या सामन्याआधी मरेविरुद्ध अँडरसनची कामगिरी १-५ अशी होती. या लढतीत तब्बल २५ बिनतोड सव्‍‌र्हिसच्या बळावर अँडरसनने मरेला निष्प्रभ केले. जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असलेल्या खेळांडूंविरुद्ध सततच्या पराभवाची मालिका अँडरसनने या विजयासह खंडित केली. उपांत्यपूर्व फेरीत अँडरसनसमोर स्टॅनिसलॉस वॉवरिन्काचे आव्हान असणार आहे.
‘ही माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम लढत होती. झुंजार आणि चिवट खेळासाठी प्रसिद्ध मरेला नमवणे संस्मरणीय आहे’, असे अँडरसनने सांगितले. ‘या टप्प्यापर्यंत पोहचण्यासाठी अथक मेहनत करावी लागली. इथून परतावे लागणे अत्यंत निराशाजनक आहे. चार तासांच्या मॅरेथॉन मुकाबल्यानंतर पराभवाला सामोरे जाणे कठीण आहे’, असे मरेने सांगितले.
वॉवरिन्काने अमेरिकेच्या युवा डोनाल्ड यंगवर ६-४, १-६, ६-३, ६-४ अशी मात केली. स्थानिक खेळाडू असलेल्या यंगने तिन्ही लढतींमध्ये शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे वॉवरिन्काविरुद्ध त्याला चाहत्यांचा मोठय़ा प्रमाणावर पाठिंबा होता. मात्र वॉवरिन्काने व्यावसायिक पद्धतीने खेळ करत यंगला नमवले. दुसरा सेट जिंकत यंगने पुनरामगनाचे संकेत दिले होते. मात्र वॉवरिन्काने पुढचे दोन्ही सेट जिंकत यंगला नामोहरम केले.
अडीच वर्षांचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी आतूर रॉजर फेडररने उंचपुऱ्या आणि भेदक सव्‍‌र्हिससाठी प्रसिद्ध जॉन इस्नरवर मात केली. फेडररने ही लढत ७-६ (०), ७-६ (६), ७-५ अशी जिंकली. आतापर्यंतच्या लढतीत तुलनेने सोपे आव्हान मिळालेल्या फेडररला इस्नरच्या रुपात खडतर सामना होता. मात्र संपूर्ण सामन्यात एकदाही सव्‍‌र्हिस न गमावता, सव्‍‌र्हिस रेषेच्या आधारे खेळताना अफलातून परतीच्या फटक्यांद्वारे त्याने इस्नरला रोखले. सलग १०८ वेळा सव्‍‌र्हिस न गमावण्याचा इस्नरचा विक्रमही फेडररने मोडीत काढला. उपांत्यपूर्व फेरीत फेडररची लढत रिचर्ड गॅस्क्वेटशी होणार आहे. गॅस्क्वेटने थॉमस बर्डीचचा ६-२, ३-६, ६-४, ६-१ असा पराभव केला.
महिलांमध्ये व्हिक्टोरिया अझारेन्काने व्हारेव्हा लेपाचेन्कावर ६-३, ६-४ असा विजय मिळवत चौथ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. फ्लॅव्हिआ पेनेट्टाने समंथा स्टोसूरचा ६-४, ६-४ असा पराभव केला. पेट्रा क्विटोव्हाने आतापर्यंत स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या जोहान कोन्टाचे आव्हान ७-५, ६-३ असे संपुष्टात आणले. द्वितीय मानांकित सिमोन हालेपने सबिन लिसिकीवर ६-७ (६-८), ७-५, ६-२ अशी मात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पेस-बोपण्णा समोरासमोर
डेव्हिस चषक स्पर्धेत भारताचे शिलेदार लिएण्डर पेस आणि रोहन बोपण्णा अमेरिकन खुल्या स्पर्धेत, मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत आमनेसामने उभे ठाकणार आहेत. बोपण्णा- युंग जान चान जोडीने स्यु वेई सेइह आणि हेन्री कोन्टिनन जोडीवर ७-६ (९-७), ७-५ (१३-११) असा विजय मिळवला. सिमोन हालेप आणि होरिया टेकाऊ जोडीने माघार घेतल्यामुळे पेस-हिंगिस जोडीचा उपांत्य फेरीत खेळण्याचा मार्ग सुकर झाला. दरम्यान बोपण्णाने पुरुष दुहेरीत फ्लोरिन मर्गेआच्या साथीने खेळताना डॅनियल नेस्टर आणि इडय़ुअर्ड रॉजर व्हॅसेलिन जोडीचा ६-७, ६-४, ६-३ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. कनिष्ठ गटात करमन कौर थांडीने जर्मनीच्या कॅथरिन होब्रागस्कीवर ६-३, ७-६ असा विजय मिळवला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andy murray beaten by kevin anderson in us open fourth round