अँडी मरेवर मात; अकराव्या ग्रँड स्लॅम जेतेपदाची कमाई
‘पराभव इतिहासजमा, जेतेपद पटकावणारच’ अशी गर्जना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीच्या पूर्वसंध्येला अँडी मरेने केली. या गर्जनेला रविवारी रॉड लेव्हर प्रांगणात, हजारो चाहत्यांच्या साक्षीने उत्तर देत नोव्हाक जोकोव्हिचने कारकीर्दीतील अकराव्या ग्रँड स्लॅम, तर ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या सहाव्या जेतेपदावर नाव कोरले. बोलून फुकट घालवण्यापेक्षा थेट कृतीतून प्रत्युत्तर देणाऱ्या जोकोव्हिचने सरळ सेट्समध्ये मरेवर मात करत श्रेष्ठ कोण हे सिद्ध केले.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आणि अग्रमानांकित जोकोव्हिचने दोन तास ५३ मिनिटांच्या लढतीत मरेवर ६-१, ७-५, ७-६ (७-३) असा विजय मिळवला. जेतेपदासह या स्पर्धेची सहा जेतेपदे पटकावण्याच्या रॉय इमर्सन यांच्या विक्रमाची जोकोव्हिचने बरोबरी केली. इमर्सन यांनी १९६१ ते १९६७ या कालावधीत हा पराक्रम केला होता. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्यांच्या यादीत, अकरा जेतेपदांसह जोकोव्हिच पाचव्या स्थानी आहे. या विजयासह ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये सलग २१ सामने अपराजित राहण्याचा विक्रमही जोकोव्हिचच्या नावावर आहे. दुसरीकडे पाच ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या अंतिम लढती गमावण्याचा नकोसा विक्रम मरेच्या नावावर झाला आहे.
पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिचने सहजपणे मरेला निष्प्रभ केले. दुसऱ्या सेटमध्ये मरेने चार ब्रेकपॉइंट्स वाचवले. मात्र जोकोव्हिचने ४-३ अशी निसटती आघाडी घेतली. ३६ फटक्यांच्या रॅलीमध्ये सरशी घेत जोकोव्हिचने दुसरा सेटही नावावर केला. मरेच्या खेळातल्या चुकांचा फायदा उठवत जोकोव्हिचने तिसऱ्या मॅचपॉइंटवर सामना जिंकला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा