इंग्लंडच्या अँडी मरेने राफेल नदालसारख्या तुल्यबळ प्रतिस्पध्र्याला नमवत माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. मरेचे कारकीर्दीतील हे पहिलेच मास्टर्स सीरिज स्पर्धेचे जेतेपद आहे. मरेने हा सामना ६-३, ६-२ असा जिंकला. क्ले कोर्टवर मरेचा नदालविरुद्ध हा पहिलाच विजय आहे.
क्ले कोर्टवर नदालविरुद्ध मरेने याआधी सात लढती गमावल्या होत्या. यंदाच्या हंगामात खेळात सुधारणा करत मरेने क्ले कोर्टवर नऊ सामने जिंकले आहेत. म्युनिक स्पर्धेद्वारे मरेने कारकीर्दीतील क्ले कोर्ट स्पर्धेचे पहिल्यांदा जेतेपद नावावर केले.
‘स्पेनमध्ये नदालविरुद्ध खेळणे हे प्रचंड आव्हान आहे. म्हणूनच या विजयाचे महत्त्व अनोखे आहे. क्ले कोर्टचा बादशाह अशी बिरुदावली मिळवलेल्या खेळाडूला नमवत जेतेपद पटकावण्याचा आनंद सुखावणारा आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या दृष्टीने हा विजय महत्त्वाचा आहे’, असे मरेने सांगितले.
क्ले कोर्ट स्पर्धामधली नदालची घसरण आश्चर्यचकित करणारी आहे. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या नदालला माँटे कालरे स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने पराभूत केले होते. बार्सिलोना स्पर्धेत फॅबिओ फॉगनिनीने नदालवर सनसनाटी विजय मिळवला होता. माद्रिद स्पर्धेद्वारे फ्रेंच खुल्या स्पर्धेसाठी चांगली तयारी करण्याचा नदालचा इरादा होता. अंतिम फेरीत धडक मारत नदालने सुरेख वाटचाल केली होती. मात्र मरेच्या झंझावातासमोर तो निष्प्रभ ठरला.
बोपण्णा भारताचा दुहेरीतील अव्वल खेळाडू
माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या जेतेपदासह रोहन बोपण्णाने जागतिक क्रमवारीत दमदार आगेकूच केली आहे. क्रमवारीत २१व्या स्थानी झेप घेतलेल्या रोहन दुहेरी क्रमवारीतला भारताचा सर्वोत्तम स्थानी असलेला खेळाडू आहे. रोमानियाच्या फ्लोरिन मर्गेआच्या साथीने खेळताना बोपण्णाने जेतेपदाची कमाई केली होती. या जेतेपदासह बोपण्णाने क्रमवारीचे १००० गुण पटकावले होते.
२०१३ मध्ये पाकिस्तानच्या ऐसाम उल हक कुरेशीच्या साथीने खेळताना बोपण्णाने क्रमवारीत तिसरे स्थान मिळवले होते. दरम्यान, लिएण्डर पेसची एका स्थानाने घसरण झाली असून, तो २४व्या स्थानी आहे. एकेरीमध्ये सोमदेव देववर्मन १७३व्या स्थानी आहे. युकी भांब्री १८०व्या स्थानी असून, क्रमवारीत भारताचा सर्वोत्तम खेळाडू होण्याची त्याला संधी आहे.
साकेत मायनेनी २२९व्या स्थानी आहे. महिलांमध्ये सानिया मिर्झा दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. सांघिक दुहेरीत क्रमवारीत बेथानी मॅटेक सँड्स
आणि ल्युसी साफ्रोव्हाने अव्वल स्थान पटकावले आहे. महिला एकेरीत अंकिता रैनाने सहा स्थानांनी सुधारणा करत २२९वे स्थान गाठले आहे.
नदाल क्रमवारीत सातव्या स्थानी
माद्रिद खुल्या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या राफेल नदालची जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी घसरण झाली आहे. गेल्या दहा वर्षांतल नदालची क्रमवारीतील ही सगळ्यात मोठी घसरण आहे. नोव्हाक जोकोव्हिच अव्वल स्थानी कायम आहे. माद्रिद स्पर्धेच्या जेतेपदासह अँडी मरे तिसऱ्या स्थानी कायम आहे. रॉजर फेडरर दुसऱ्या स्थानी स्थिर आहे. मिलास राओनिक चौथ्या तर टॉमस बर्डीच पाचव्या तर जपानचा युवा खेळाडू केई निशिकोरीने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.