इंग्लंडच्या अँडी मरेने राफेल नदालसारख्या तुल्यबळ प्रतिस्पध्र्याला नमवत माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. मरेचे कारकीर्दीतील हे पहिलेच मास्टर्स सीरिज स्पर्धेचे जेतेपद आहे. मरेने हा सामना ६-३, ६-२ असा जिंकला. क्ले कोर्टवर मरेचा नदालविरुद्ध हा पहिलाच विजय आहे.
क्ले कोर्टवर नदालविरुद्ध मरेने याआधी सात लढती गमावल्या होत्या. यंदाच्या हंगामात खेळात सुधारणा करत मरेने क्ले कोर्टवर नऊ सामने जिंकले आहेत. म्युनिक स्पर्धेद्वारे मरेने कारकीर्दीतील क्ले कोर्ट स्पर्धेचे पहिल्यांदा जेतेपद नावावर केले.
‘स्पेनमध्ये नदालविरुद्ध खेळणे हे प्रचंड आव्हान आहे. म्हणूनच या विजयाचे महत्त्व अनोखे आहे. क्ले कोर्टचा बादशाह अशी बिरुदावली मिळवलेल्या खेळाडूला नमवत जेतेपद पटकावण्याचा आनंद सुखावणारा आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या दृष्टीने हा विजय महत्त्वाचा आहे’, असे मरेने सांगितले.
क्ले कोर्ट स्पर्धामधली नदालची घसरण आश्चर्यचकित करणारी आहे. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या नदालला माँटे कालरे स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने पराभूत केले होते. बार्सिलोना स्पर्धेत फॅबिओ फॉगनिनीने नदालवर सनसनाटी विजय मिळवला होता. माद्रिद स्पर्धेद्वारे फ्रेंच खुल्या स्पर्धेसाठी चांगली तयारी करण्याचा नदालचा इरादा होता. अंतिम फेरीत धडक मारत नदालने सुरेख वाटचाल केली होती. मात्र मरेच्या झंझावातासमोर तो निष्प्रभ ठरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा