महिलांमध्ये गार्बिनसमोर सेरेनाचे आव्हान
कारकीर्दीत ग्रँड स्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी आतूर असलेला नोव्हाक जोकोव्हिच ऐतिहासिक जेतेपदापासून अवघ्या एका विजयाच्या अंतरावर आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत जोकोव्हिचने नवोदित डॉमिनिक थिइमचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली. अन्य लढतीत अँडी मरेने गतविजेत्या स्टॅनिलॉस वॉवरिन्काचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली. आता रविवारी जोकोव्हिच आणि मरे या तुल्यबल प्रतिस्पर्धीमध्ये जेतेपदासाठी मुकाबला रंगणार आहे. महिलांमध्ये जेतेपदासाठी गार्बिन म्युग्युरुझासमोर जागतिक क्रमवारीत अव्वल आणि अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सचे आव्हान आहे.
जोकोव्हिचने डॉमिनिक थिइमचा ६-२, ६-१, ६-४ असा धुव्वा उडवला. उपांत्य फेरीतील अन्य लढतीत द्वितीय मानांकित मरेने स्टॅनिसलॉस वॉवरिन्काला ६-४, ६-२, ४-६, ६-३ असे नमवले.
गतविजेत्या सेरेनाला नेदरलँड्सच्या किकी बर्टन्सने प्रत्येक गुणाकरिता झुंजविले. सेरेनाने हा सामना ७-६ (९-७), ६-४ असा जिंकला.
गार्बिनने समंथाला ६-२, ६-४ असे सहज हरविले. महिलांच्या दुहेरीत रशियाच्या एकतेरिना माकारोवा व एलिना व्हेसनिना जोडीने अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतील सरळ लढतीत त्यांनी बार्बरा क्रॅजिसोवा व कॅटरिना सिनियाकोवा यांना ६-४, ६-२ असे पराभूत केले. पुरुषांच्या दुहेरीत मार्क लोपेझ व फेलेसियानो लोपेझ या स्पॅनिश जोडीने उपांत्य सामन्यात इव्हान डोडिग व मार्सेलो मिलो यांच्यावर ६-३, ३-६, ७-५ असा निसटता विजय नोंदवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा