जोकोव्हिच, नदालचा धडाकेबाज प्रारंभ; कर्बर पहिल्याच फेरीत गारद

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लाल मातीचा बादशाह’ समजल्या जाणाऱ्या स्पेनच्या रॅफेल नदालसह राफेल नदाल, अँडी जोकोव्हिच आणि व्हिनस विल्यम्स यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचा धडाकेबाज प्रारंभ केला. माजी ग्रँड स्लॅम विजेत्या अँडी मरेने दोन सेट्स गमावल्यानंतर विजय मिळवून आव्हान राखले आहे. मात्र ऑस्ट्रेलियन विजेत्या अँजेलिक कर्बरला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे

रोलँड गॅरोस मैदानावर विजेतेपदाची दशकपूर्ती करण्यासाठी उतरलेल्या राफेल नदालने ऑस्ट्रेलियाच्या सॅम ग्रोथचा ६-१, ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला. त्याने परतीचे खणखणीत फटके व बिनतोड सव्‍‌र्हिस असा बहारदार खेळ करीत निर्विवाद वर्चस्व गाजवले. नदालने या स्पर्धेत २००५ ते २००८ व २०११ ते २०१४ या कालावधीत जेतेपद मिळवले आहे.

विजेतेपदाचा दावेदार असलेल्या मरे या ब्रिटिश खेळाडूला पहिल्याच फेरीत संघर्ष करावा लागला. त्याने पाच सेट्सपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत चेक प्रजासत्ताकच्या राडेक स्टेपानेकला हरवले. अतिशय उत्कंठापूर्ण झालेला हा सामना मरेने ३-६, ३-६, ६-०, ६-३, ७-५ असा जिंकला. पहिल्या दोन सेट्समध्ये मरेला सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण राखता आले नाही. परंतु तिसऱ्या सेटमध्ये त्याला सूर गवसला. त्याने या सेटमध्ये पासिंग शॉट्स व अचूक सव्‍‌र्हिस करीत सलग सहा गेम्स घेतले. चौथ्या व पाचव्या सेटमध्ये स्टेपानेकने चिवट लढत दिली. मात्र मरेने खेळावर नियंत्रण ठेवत विजय मिळवला.

जोकोव्हिचने तैवानच्या येन हुसानलु याच्यावर ६-४, ६-१, ६-३ असा सफाईदार विजय मिळवला. त्याने अव्वल मानांकनास साजेसा खेळ करीत हा सामना जिंकला. सायप्रसच्या माकरेस बघदातीसने गिलेस म्युलरला पहिल्याच फेरीत ७-५, ६-४, ६-१ असे गारद केले.

संघर्षपूर्ण लढतींबाबत विशेष ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या जॉन इस्नेरने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनला पराभूत केले. त्याने हा सामना ६-७ (४-७), ७-६ (१४-१२), ७-६ (९-७), ७-५ असा जिंकून दुसरी फेरी गाठली. सातव्या मानांकित टॉमस बर्डीचने कॅनडाच्या वासेक पोस्पिसिलवर ६-३, ६-२, ६-१ असा सफाईदार विजय मिळवला. २०व्या मानांकित बर्नार्ड टॉमिकने अमेरिकेच्या ब्रायन बेकरला ६-३, ६-४, ६-४ असे हरवले.

महिला एकेरीत व्हिनस विल्यम्सने इस्तोनियाच्या अ‍ॅनेट कोन्टाव्हिटला रंगतदार लढतीत ७-६ (७-५), ७-६ (७-४) असे पराभूत केले. सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोविकने स्थानिक खेळाडू ओसिनी डोडीनला ६-०, ५-७, ६-२ असे हरवले.

ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सेरेना विल्यम्सला हरवण्याची किमया साधणाऱ्या कर्बरला पहिल्याच फेरीचा अडथळा ओलांडण्यात अपयश आले. नेदरलँड्सच्या किकी बर्टन्सने तिच्यावर ६-२, ३-६, ६-३ असा सनसनाटी विजय नोंदवला. अनुभवी येलेना यान्कोव्हिचचेही आव्हान संपुष्टात आले. जर्मनीच्या तात्जाना मारियाने तिच्यावर ६-३, ३-६, ६-३ अशी मात केली. माजी ग्रँड स्लॅम विजेत्या समंथा स्टोसूरने जपानच्या मिसाकी दोईचा ६-२, ४-६, ६-३ असा पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andy murray goes next round of french open tennis tournament