लाल मातीवरची राफेल नदालची हुकूमत मोडून काढण्यासाठी सक्षम असलेल्या इंग्लंडच्या अँडी मरेने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. सातव्या मानांकित मरेने स्पेनच्या फर्नाडो व्हर्डास्कोवर ६-४, ७-५, ७-६ (७-३) अशी मात केली. तिसऱ्या सेटच्या सातव्या गेममध्ये गुण पटकावण्याच्या मुद्यावरून मरे आणि व्हर्डास्को यांच्यात वादावादी झाली. अखेर मरेने नमते घेतल्याने व्हर्डास्कोला गुण देण्यात आला. या विजयासह मरेची व्हर्डास्कोविरुद्धची कामगिरी १०-१ अशी आहे. विम्बल्डन विजेत्या अँडी मरेला आतापर्यंत फ्रेंच खुल्या स्पर्धेत केवळ उपांत्य फेरीपर्यंतच मजल मारता आली आहे. उपांत्य फेरीत स्थान पटकावण्यासाठी त्याचा गेइल मॉनफिल्सशी मुकाबला होणार आहे.
सानिया-कॅरा जोडी पराभूत
पॅरिस : सानिया मिर्झा आणि तिची झिम्बाब्वेची साथीदार कॅरा ब्लॅक जोडीला फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. स्यु वेई हेसह आणि शुआई पेंग जोडीने सानिया-ब्लॅक जोडीवर ६-२, ३-६, ६-३ असा विजय मिळवला. सानिया-ब्लॅक जोडीचा स्यु-पेंग जोडीविरुद्ध झालेला हा तिसरा पराभव आहे. याआधी इंडियन वेल्स आणि माद्रिद स्पर्धेत सानिया-ब्लॅक जोडीचे आव्हान स्यू-पेंग जोडीनेच संपुष्टात आणले होते. तीन तास चाललेल्या लढतीत सानिया-ब्लॅक जोडीला आठपैकी केवळ तीन ब्रेकपॉइंट्सचा उपयोग करून घेता आला. सानियाच्या पराभवासाह स्पर्धेतील भारताचे अ व्हानही संपुष्टात आले आहे. मिश्र दुहेरीत सानिया आणि तिचा रोमानियाचा साथीदार होरिआ टेकाऊ जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. रोहन बोपण्णाचा मिश्र तसेच पुरुष दुहेरीत पराभव झाला होता.

Story img Loader