ग्रँड स्लॅम विश्वातल्या सगळ्यात कठीण अशा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे समोरासमोर असणार आहेत. जागतिक क्रमवारीत अव्वल आणि अव्वल मानांकित जोकोव्हिच कारकीर्दीत ग्रँड स्लॅम जेतेपदांचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी आतुर आहे. त्याच्या नावावर ११ ग्रँड स्लॅम जेतेपदे आहेत. मात्र फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या लाल मातीवर जेतेपदाने त्याला हुलकावणी दिली आहे. १७ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असलेला रॉजर फेडरर आणि ‘लाल मातीचा बादशाह’ राफेल नदाल यांनी दुखापतींच्या कारणास्तव माघार घेतल्याने जोकोव्हिचचा मार्ग सुकर झाला आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचने तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे. मात्र जेतेपदापासून त्याला वंचित राहावे लागले आहे.
कनिष्ठ स्पर्धापासून जोकोव्हिचचा समकालीन अँडी मरे तिसऱ्या ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. याआधी त्याने विम्बल्डन आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला आहे. मात्र फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मरेलाही जेतेपदापासून दूर राहावे लागले आहे. जोकोव्हिचविरुद्धच्या ३३ लढतींमध्ये मरेला केवळ १० लढतीत विजय मिळवता आला आहे. क्ले कोर्टवरही जोकोव्हिच ४-१ आघाडीवर आहे.

Story img Loader