इच्छाशक्तीला सातत्यपूर्ण खेळाची जोड दिली तर विजेतेपदाच्या मार्गात वयाचा अडथळा येत नाही, याचाच प्रत्यय घडवत ३३ वर्षीय सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. जेतेपदासाठी तिच्यापुढे टेनिस सौंदर्यसम्राज्ञी मारिया शारापोव्हाचे आव्हान असणार आहे. याचप्रमाणे राफेल नदालला माघारी पाठवणाऱ्या टॉमस बर्डीचची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित करत अँडी मरेने पुरुषांच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.
अव्वल मानांकित सेरेनाला अमेरिकेच्याच मॅडीसन की हिला ७-६ (७-५), ६-२ असे हरवताना झगडावे लागले. त्या तुलनेत शारापोव्हाच्या झंझावातापुढे तिची सहकारी एकतेरिना माकारोव्हाचा ६-३, ६-२ असा दारुण पराभव झाला. पुरुषांच्या गटात चौथ्यांदा अंतिम फेरी गाठताना मरेने बर्डीचवर ६-७ (६-८), ६-०, ६-३, ७-५ अशी मात केली. यापूर्वी तीनही अंतिम फेरीत मरेला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
१९ वर्षीय मॅडीसनने आपलीच ज्येष्ठ सहकारी सेरेना हिला कौतुकास्पद लढत दिली. पहिल्या सेटमध्ये तिने खोलवर सव्र्हिस व परतीचे खणखणीत फटके असा चतुरस्र खेळ करीत सेरेना हिला प्रत्येक गुणासाठी झुंजविले. टायब्रेकरमध्येही तिने कल्पक खेळ करीत आपल्या भावी यशाची झलक दाखवली. मात्र सेरेनाने तारुण्यापेक्षा अनुभव श्रेष्ठ याचा प्रत्यय घडवत टायब्रेकरद्वारा पहिला सेट घेतला. दुसऱ्या सेटमध्ये सेरेनाने खेळावर नियंत्रण मिळवले. तिने केलेल्या क्रॉसकोर्ट फटक्यांपुढे मॅडीसनचा बचाव निष्प्रभ ठरला. हा सेट सहज घेत सेरेनाने अंतिम फेरीकडे वाटचाल केली. तिने ही कामगिरी करताना अंतिम फेरीतील सर्वात प्रौढ खेळाडू होण्याचा मान मिळविला आहे. ख्रिस एव्हर्टने ३२व्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती.
शारापोव्हाने या स्पर्धेत आतापर्यंत धडाकेबाज विजय मिळविले आहेत, मात्र तिला सेरेनाविरुद्धच्या १८ सामन्यांपैकी १६ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. २००४नंतर तिला सेरेनाविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे सेरेनाचे पारडे जड आहे.
माजी विजेत्या नदालवर मात करत बर्डीचने मोठय़ा अपेक्षा निर्माण केल्या होत्या. मात्र मरेच्या बहारदार खेळापुढे त्याचे आव्हान टिकले नाही. त्याने पहिला सेट ७-६ (८-६) असा जिंकून आणखी एक आश्चर्याचा धक्का देण्याचे सूचित केले. परंतु मरेने बिनतोड सव्र्हिसबरोबर जमिनीलगत सुरेख फटके मारत त्याची घोडदौड रोखली. मरेचे माजी प्रशिक्षक डॅनी व्हॅलेव्हर्दू यांना आपले प्रशिक्षक नेमून बर्डीचने खळबळ उडविली होती. प्रशिक्षकांच्या सल्ल्याबरोबरच प्रत्यक्ष मैदानावरील खेळही महत्त्वाचा असतो, हेच मरेने आपल्या खेळाद्वारे बर्डीचला शिकविले.
मरेला ऑस्ट्रेलियन जेतेपदाचे स्वप्न साकारण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. नोव्हाक जोकोव्हिच व स्टॅनिसलास वॉवरिन्का यांच्यात शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या खेळाडूशी मरेला रविवारी दोन हात करावे लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा