कारकीर्दीत ५००हून अधिक विजय साजऱ्या करणाऱ्या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसलेला ब्रिटनचा अ‍ॅण्डी मरे आणि जेतेपद कायम राखण्याच्या प्रयत्नात असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच रविवारी मियामी खुल्या टेनिस स्पध्रेत जेतेपदासाठी आमनेसामने आले आहेत.
उपांत्य फेरीत मरेने झेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डीचवर ६-४, ६-४ असा सोपा विजय मिळवून तिसऱ्यांदा मियामीचे जेतेपद पटकावण्याच्या दिशेने कूच केली. वर्षांच्या पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेत जेतेपदाच्या लढतीत जोकोव्हिचने मरेवर विजय मिळवला होता. त्यामुळे त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी मरे उत्सुक आहे. जोकोव्हिचने उपांत्य फेरीत जॉन इस्नरचा ७-६ (७-३), ६-२ असा पराभव केला आहे.
जोकोव्हिचला मियामीचे जेतेपद पटकावून नवा विक्रम करण्याची संधी आहे. त्याने रविवारी जेतेपद पटकावल्यास इंडियन वेल्स आणि मियामी मास्टर्स स्पध्रेचे सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावणारा तो पहिला खेळाडू बनेल. त्याने यापूर्वी २०११ व २०१३ मध्ये अशी कामगिरी केली आहे.   ‘‘  या वर्षी आम्ही दोन वेळा एकमेकांविरुद्ध खेळलो आहोत आणि ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेची अंतिम लढत शारीरिक कसोटी पाहणारी होती,’’ असे जोकोव्हिच म्हणाला.

सानिया, हिंगीस जोडी अंतिम फेरीत
मियामी : भरताची सानिया मिर्झा आणि स्वित्र्झलडची मार्टिना हिंगीस या जोडीने मियामी खुल्या टेनिस स्पध्रेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अव्वल मानांकित मिर्झा व हिंगीस जोडीने ६-२, ६-४ अशा फरकाने बाबोस व मॅलाडेनोविक जोडीचा पराभव केला. अंतिम फेरीत त्यांना एकाटेरिना माकारोवा आणि एलेना वेस्नीना या जोडीचा सामना करावा लागेल.  

Story img Loader