अँडी मरेने आपल्या टेनिस कारकिर्दीत मागील पाच वर्षांत तीनदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र दोन नोव्हाक जोकोव्हिचने, तर एकदा रॉजर फेडररने त्याचे स्वप्न धुळीस मिळवले. रविवारी पुन्हा ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम त्याला साद घालते आहे आणि पुन्हा सामना आहे तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अग्रमानांकित जोकोव्हिचशी. परंतु या वेळी अंतिम फेरीचा अडथळा ओलांडून विजेतेपद काबीज करण्याचा निर्धार मरेने केला आहे.
अ‍ॅमेली मोरेस्मो या अनुभवी महिला खेळाडूला प्रशिक्षक म्हणून नेमल्यानंतर मरेच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. त्याने यंदा या स्पर्धेत सहा सामन्यांमध्ये केवळ दोन सेट्स गमावले आहेत. जोकोव्हिचच्या तुलनेत मरेने या मोसमात अतिशय प्रभावी खेळ केला आहे. त्यामुळेच जोकोव्हिचवर अंतिम सामन्याचे विशेष दडपण असेल.

Story img Loader