सेरेना विल्यम्सवर दिमाखदार विजय

अफलातून खेळासह सेरेना विल्यम्ससारख्या दिग्गज खेळाडूला नमवत जर्मनीच्या अँजेलिक्यू कर्बरने कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम जेतेपदाला गवसणी घातली. कर्बरने जेतेपदाची प्रबळ दावेदार असणाऱ्या सेरेनावर ६-४, ३-६, ६-४ असा विजय मिळवला. जेतेपदासह स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी सेरेनाकडे होती. स्टेफी ग्राफचेच मार्गदर्शन लाभलेल्या कर्बरच्या सर्वागीण खेळामुळे सेरेनाचे स्वप्न भंगले. १९९९ मध्ये स्टेफीच्या फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदानंतर जर्मनीच्या खेळाडूने ग्रँड स्लॅम जेतेपद पटकवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी, अग्रमानांकित आणि गतविजेती सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या सहा अंतिम लढती जिंकल्या होत्या. या स्पर्धेचे सातवे जेतेपद मिळवण्यासाठी सेरेना उत्सुक होती. मात्र स्वैर खेळामुळे सेरेनाला पराभवाला सामोरे जावे लागले.

सेरेनाच्या हातून झालेल्या २३ चुकांचा पुरेपूर फायदा उठवत कर्बरने पहिला सेट जिंकला. लौकिकाला साजेसा खेळ करत सेरेनाने दुसरा सेट नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये कर्बरने २-० अशी आघाडी घेतली. या आघाडीच्या बळावर कर्बरने आगेकूच केली. सेरेनाने चार ब्रेकपॉइंट वाचवत परतण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वैर फटक्यांमुळे तो अयशस्वी ठरला.

जेतेपदापर्यंतची वाटचाल

फेरी            प्रतिस्पर्धी          विजयाचे अंतर

पहिली फेरी       मिसाकी डोई          ६-७, ७-६, ६-३

दुसरी फेरी      अलेक्झांड्रा दुलघेरु         ६-२, ६-४

तिसरी फेरी      मॅडिसन ब्रेंगल                   ६-१, ६-३

चौथी फेरी       अनिका बेक              ६-४, ६-०

उपांत्यपूर्व        व्हिक्टोरिया अझारेन्का      ६-३, ७-५

उपांत्य          जोहाना कोन्टा            ७-५, ६-२

अंतिम         सेरेना विल्यम्स               ६-४, ३-६, ६-४

गेली अनेक वर्ष कर्बर सातत्यपूर्ण प्रदर्शन करते आहे. तिच्या अविरत मेहनतीचे हे जेतेपद प्रतीक आहे. तिने सुरेख खेळ करत केला. माझ्यापरीने सर्वोत्तम खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अपुराच ठरला. प्रत्येक लढत मी जिंकावी अशी अपेक्षा असते. माझे जिंकणे रोबोप्रमाणे वाटते. पण मी रोबो नाही.

सेरेना विल्यम्स, उपविजेती

मी सातत्याने परिश्रम घेत होते. या मेहनतीचे फळ म्हणजे हे जेतेपद आहे. ग्रँड स्लॅम विजेती आहे असे अभिमानाने सांगू शकते. ही भावनाच अद्भुत आहे.ऐतिहासिक सेंटर कोर्टवर खेळताना अनोख्या भावना दाटल्या होत्या.  गेले दोन आठवडे माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम आहेत.

अँजेलिक्यू कर्बर,  महिला एकेरी विजेती

Story img Loader