नवोदित मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा शरीरसौष्ठवपटू अनिल बिलावा याने मुंबई श्रीचा किताब पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. नवोदित मुंबई श्री स्पर्धेत उतरण्यापूर्वी ज्या शरीरसौष्ठवपटूकडे कोणी गांभीर्याने पाहिले नव्हते. त्या अनिलने भारतातील प्रतिष्ठेच्या मुंबई श्री स्पर्धेचा किताब पटकावला. संभाव्य विजेत्यांवर त्याने सहजगत्या मात केली आणि स्पार्टन मुंबई श्रीचे जेतेपद निर्विवाद जिंकण्याचा पराक्रम केला. याचसह गेल्या वर्षी न होऊ शकलेल्या पीळदार सौंदर्यवतींच्या मिस मुंबई स्पर्धेत डॉ. मंजिरी भावसार यांनी बाजी मारली.
मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात आजवर एकाच मोसमात नवोदित मुंबई श्री जिंकल्यानंतर मुंबईच्या बाहुबलींना नमवून मुंबई श्री जिंकणारा अनिल बिलावा हा पहिलाच शरीरसौष्ठवपटू ठरला आहे. अनिल बिलावाने सलग दोन स्पर्धा जिंकून एक नवा आणि अत्यंत दुर्मिळ असा इतिहास रचला. तसेच महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात पीळदार सौंदर्यवतीच्या मिस मुंबई स्पर्धेत एफएसटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली.
आरोग्य प्रतिष्ठानला बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई उपनगर बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनने आयोजनाची संधी दिली. मुंबईकर आणि शरीरसौष्ठवपटूंच्या फिटनेससाठी प्रथमच आयोजित केलेला मुंबई फिटनेस सोहळा तब्बल पाच हजारांपेक्षा अधिक क्रीडाप्रेमींच्या गर्दीमुळे हिट ठरला. एकंदर ९ गटातील ४८ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. ५५ किलो वजनी गटात नितीन शिगवणने जितेंद्र पाटीलवर मात केली. ६० किलो वजनी गटात देवचंद गावडेचे कडवे आव्हान अविनाश वनेने मोडून काढले. उमेश गुप्ता ६५ किलो वजनी गटात सरस ठरला. त्याने अनुभवी संदेश सकपाळला मागे टाकले. ७० किलो वजनी गटात रोहन गुरवने संदीप कवडे, महेश पवारपेक्षा सरस सौष्ठवाचे प्रदर्शन करीत गट विजेतपदावर आपले नाव कोरले, तर ७५ किलो वजनी गटात भास्कर कांबळीने आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात १७० सेंमी उंचीच्या गटात महेश गावडे तर १७० सेंमीवरील उंचीच्या गटात शुभम कांदू अव्वल आला.
सुशील मुरकरचे गणित चुकले
गेल्या तीन महिन्यात धारावी श्री, दहिसर श्री, शंकर श्री, साहेब श्री, पुंचिकोरवे श्री अशा सलग पाच स्पर्धा जिंकणारा सुशील मुरकर यंदाच्या मुंबई श्रीचा संभाव्य विजेता वाटत होता. पण वजन तपासणीच्या वेळी अचानक आलेला अनिल बिलावा ८० किलो वजनी गटात खेळला आणि ८१ किलो वजन असलेला सुशीलही एक किलो कमी करून त्याच गटात खेळला. बिलावाबद्दल कसलीही कल्पना नसल्यामुळे सुशीलचे ८० किलो वजनी गटात खेळल्याचे गणित चुकले आणि तो बिलावाकडून गटातच बाद झाला.
बिलावा जैसा कोई नहीं…
दोन महिन्यांपूर्वी नवोदित मुंबई श्री स्पर्धेद्वारे अनिल बिलावा पहिल्यांदाच शरीरसौष्ठवाच्या मंचावर उतरला होता. त्यापूर्वी त्याचे नाव कुणाच्याही परिचयाचे नव्हते किंवा कुणीही ऐकले नव्हते. ती त्याची पहिलीच स्पर्धा होती. प्रशिक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तो नवोदित मुंबई श्रीमध्ये उतरला आणि त्याने अनपेक्षित जेतेपद पटकावले. त्यानंतर तो थेट स्पार्टन मुंबई श्री स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या वेळी आला आणि त्याने स्पर्धा जिंकली. अनिल बिलावा याच्या यशामागे प्रशिक्षक संजय चव्हाण यांची मेहनत आहे.
मंजिरी भावसार ठरली मिस मुंबई
पीळदार सौंदर्यवतीच्या मिस मुंबई स्पर्धेत डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली. गतवर्षी अवघ्या दोन स्पर्धकांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र यावेळी आरोग्य प्रतिष्ठानने अत्यंत अभूतपूर्वरित्या आयोजित केलेल्या महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकाराला सात खेळाडूंचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे लक्षवेधी झालेल्या या स्पर्धेत मंजिरीने हीरा सोलंकीवर मात करीत आपले पहिलेवहिले मिस मुंबई जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे दहा वर्षाच्या शौर्यची आई असलेल्या मंजिरी हिने आपल्या नवऱ्याने दिलेल्या प्रोत्साहनाच्या जोरावर ही स्फूर्ती देणारी किमया करून दाखविली. ५२ वर्षांची निशरिन पारिख या स्पर्धेत तिसरी आली.
स्पार्टन मुंबई श्री २०१९ च्या अंतिम फेरीचा निकाल
55 किलो – 1. नितीन शिगवण (वक्रतुंड), 2. जितेंद्र पाटील (माँसाहेब), 3. राजेश तारवे (माँसाहेब), 4. नितेश कोळेकर (परब फिटनेस), 5. अजिंक्य पवार (बाळ व्यायाम मंदिर), 6. ओंकार आंबोकर (बॉडी वर्कशॉप)
60 किलो – 1. अविनाश वने (आर.एम.भट), 2. देवचंद गावडे (परब फिटनेस), 3. आकाश घोरपडे (करमरकर जिम), 4. अरूण पाटील (जय भवानी), 5. चेतन खारवा (माँसाहेब), 6. तुषार गुजर (माँसाहेब)
65 किलो – 1. उमेश गुप्ता (वसंत जिम), 2. संदेश सकपाळ (परब फिटनेस), 3. जगदिश कदम (बॉडी वर्कशॉप), 4. बप्पन दास ( आरकेएम), 5. साजिद मलिक (फ्युचर फिटनेस), 6. निलेश घडशी (बॉडी वर्कशॉप)
70 किलो – 1. रोहन गुरव (बाल मित्र व्यायामशाळा), 2. संदीप कवडे (एच.एम.बी. जिम), 3. महेश पवार (हर्क्युलस जिम), 4. मनोज मोरे (बाल मित्र व्यायामशाळा), 5. विशाल धावडे (बाल मित्र व्यायामशाळा), 6. गणेश पेडामकर ( बॉडी वर्कशॉप)
75 किलो – 1. भास्कर कांबळी (ग्रेस जिम), 2. मोहम्मद हुसेन (परब फिटनेस), 3. अमोल गायकवाड (मिशन फिटनेस), 4. अर्जुन पुंचिकुरवे (गुरूदत्त व्यायामशाळा), 5. लीलाधर म्हात्रे (कृष्णा जिम), 6. आशिष लोखंडे(रिसेट फिटनेस)
80 किलो – 1. अनिल बिलावा (हर्क्युलस जिम), 2. सुशील मुरकर (जे.एम.के.एम), 3. सुशांत रांजणकर (आर.एम.भट), 4. मोहम्मद शब्बीर शेख (परब फिटनेस), 5. सुयश पाटील (इन्सेन फिटनेस), 6. अभिषेक खेडेकर(पंपिंग आर्यन)
85 किलो – 1. सकिंद्र सिंग (फॉर्च्युन फिटनेस),2. दिपक तांबीटकर (रिजस फिटनेस), 3. उबेद पटेल (बिस्ट हाऊस जिम), 4. सुबोध यादव (बॉडी वर्कशॉप), 5. रोमियो बॉर्जेस (परब फिटनेस), 6. निशांत कोळी (वेगस जिम)
90 किलो – 1. महेश राणे (बालमित्र जिम), 2. प्रसाद वाळंज ( बॉडी वर्कशॉप ), 3. विजय यादव (परब फिटनेस)
90 किलोवरील गट – 1. निलेश दगडे (परब फिटनेस), 2. रविकांत पाष्टे (परब फिटनेस)
स्पार्टन मुंबई श्री 2019 – अनिल बिलावा (हर्क्युलस जिम), उपविजेता – भास्कर कांबळी (ग्रेस जिम), तृतीय क्रमांक – नीलेश दगडे (परब फिटनेस)
बेस्ट पोझर – अभिषेक खेडेकर (पंपिंग आर्यन)
सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू – सकिंदर सिंग (फॉर्च्युन फिटनेस)
फिजीक स्पोर्टस् (पुरूष-170 सेंमी) – 1. महेश गावडे ( आर.के.एम.), 2. विजय हाप्पे (परब फिटनेस), 3. प्रथमेश बागायतकर (परब फिटनेस), 4. अनिकेत चव्हाण (रिजिअस जिम), 5. मोहम्मद इजाझ खान (आर.के.एम.), 6. लवेश कोळी (गुरूदत्त व्यायामशाळा)
फिजीक स्पोर्टस् (पुरूष-170 सेंमीवरील) – 1. शुभम कांदू (बालमित्र व्यायामशाळा), 2. आतिक खान (फॉर्च्युन फिटनेस), 3. स्वराज सिंग (मेंगन जिम), 4. मिमोह कांबळे ( न्यूयॉर्क जिम), 5. प्रणिल गांधी (फॉर्च्युन फिटनेस), 6. अनिकेत महाडिक (हर्क्युलस जिम )
मिस मुंबई (विमेन्स फिजीक स्पोर्टस्) – 1. मंजिरी भावसार (एफएसटी जिम), 2. हीरा सोलंकी (तळवलकर्स जिम), 3. निशरीन पारीख, 4. रेणूका मुदलीयार(आर.के. फिटनेस), 5. वीणा महाले (बॉडी वर्कशॉप ), 6. प्रतीक्षा करकेरा (बाल मित्र व्यायामशाळा)