चेन्नई सुपर किंग्जसाठी तिसरे आणि एकूण सहावे जेतेपद मिळवून आयपीएल कारकिर्दीचा शेवट करणाऱ्या अंबाती रायडूसाठी ही एक स्वप्नवत अशी परिपूर्ण कथा होती. रायडू, भारतीय क्रिकेटमधील खऱ्या उत्तम खेळाडूपैकी एक आहे, त्याची टीम इंडियातील कारकिर्द पाहता त्याला फार कमी यश मिळाले असे मानले जाते. भारतासाठी ५५ एकदिवसीय आणि ६ टी२० सामने खेळूनही, रायडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायमस्वरूपी स्थान मिळविता आले नाही.
२०१९साठी विश्वचषकाच्या तयारीदरम्यान त्याची टीम इंडियात निवड झाली नाही, हा विषय अजूनही चर्चेत आहे. त्यावेळी संघ चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा शोध घेत होता आणि याच दरम्यान रायडूच्या रूपात नवीन पर्याय उपलब्ध झाला होता. मात्र ऐनवेळी माशी शिंकली आणि त्याला संघात स्थान मिळाले नाही.
सप्टेंबर २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान, रायडू भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शानदार कामगिरी करत होता. आयपीएल २०१८ मध्ये, तो ६०२ धावा करत टी२० फलंदाजीच्या शिखरावर पोहोचला होता, रायडूने त्या सहा महिन्यांच्या कालावधीत २१ एकदिवसीय सामने खेळले त्यात त्याने एक शतक आणि चार अर्धशतकांसह ६३९ धावा केल्या. मात्र, जेव्हा इंग्लंडमधील विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्यात आला, तेव्हा रायडूचे नाव आश्चर्यकारकरित्या गायब झाले. त्याऐवजी त्यांनी के. एल. राहुलला त्याच्याऐवजी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून निवडले. तसेच, त्या वर्षीच्या IPL मधील कामगिरीच्या आधारे अष्टपैलू विजय शंकरला संधी देण्यात आली. ऐनवेळी संघात करण्यात आलेला हा प्रयोग अयशस्वी ठरला.
कुंबळेने रायडूचा २०१९ विश्वचषकात समावेश न करणे ही चूक असल्याचे म्हटले
रायडूची अप्रतिम कारकीर्द चालू होती मात्र तरीही त्याला वगळले यावर भारताचा माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेला वाटते की “रायडूला इंग्लंडला घेऊन न जाणे ही ‘घोडचूक’ होती. सहा महिने या विशिष्ट भूमिकेसाठी तयार केल्यानंतर रायडूला शेवटच्या क्षणी वगळणे तत्कालीन कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून मोठी चूक होती असे माजी भारतीय प्रशिक्षकाचे मत आहे.
कुंबळे गुजरात टायटन्सच्या डावानंतर आयपीएल २०२३ ची अंतिम फेरी पावसामुळे रखडली तेव्हा जिओ सिनेमावर सांगताना म्हणाला की, “रायडूने २०१९ चा विश्वचषक खेळायला हवा होता, यात अजिबात काही शंका नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाकडून झालेली ही खूप मोठी घोडचूक होती. तुम्ही त्याला या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी इतके दिवस तयार केले आणि त्याचे नाव अचानक संघातून गायब झाले. हे विचार करण्यापलीकडेचे आहे.”
२०१९चा विश्वचषक वगळल्यानंतर रायडूचे काय झाले?
रायडूला वागळण्याच्या निर्णयाचे त्यावेळी बरेच पडसाद उमटले. निवडीबद्दल नाराज झालेल्या रायडूने “विजय शंकर हा 3D (3 आयामी) खेळाडू आहे” अशी टीका केली होती. माजी मुख्य निवडकर्ता एम. एसके. प्रसाद यांच्या स्पष्टीकरणावर त्याने सडकून टीका केली. तो म्हणाला होता की, “विश्वचषक पाहण्यासाठी 3D ग्लासेसचा नवीन सेट ऑर्डर केला.” असे त्याने ट्विट केले होते . रायडूने विश्वचषक सुरु असताना निवृत्तीची घोषणाही केली. दुर्दैवाने, रायडू पुन्हा कधीही भारतासाठी खेळला नाही ज्यामुळे त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा वाईट शेवट झाला.