बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांचे स्पष्टीकरण

भारताचे प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील वाद ऐरणीवर असताना मध्यस्थीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तातडीने शिष्टमंडळ पाठवले. मात्र कुंबळे-कोहली वाद कपोलकल्पित आहे, असे स्पष्टीकरण या शिष्टमंडळातील बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांनी दिले आहे.

‘‘कुंबळे-कोहली वादाबाबत मी अनभिज्ञ आहे. हा वाद काल्पनिक आहे. अशा प्रकारच्या अफवा अजिबात विश्वसनीय नाहीत,’’ असे चौधरी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भारतीय संघाच्या सराव सत्राप्रसंगी सांगितले.

आग असल्याशिवाय धूर दिसत नाही, अशा आशयाचा प्रश्न एका प्रतिनिधीने विचारताच झारखंडचे माजी पोलीस अधिकारी चौधरी यांनी धूर्तपणे म्हटले की, ‘‘मला कुठेच धूर दिसत नाही!’’

तुमचा इंग्लंडला नियोजित दौरा नसतानाही, तुम्ही येथे येण्याचे तात्पर्य काय, या प्रश्नालाही चातुर्याने उत्तर देताना चौधरी म्हणाले, ‘‘छान, म्हणजे माझ्या दौऱ्यांच्या योजना माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती असतात.’’

कुंबळे यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ १८ जूनला संपत आहे. या पाश्र्वभूमीवर नव्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे, हे मात्र चौधरी यांनी आवर्जून सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘क्रिकेटच्या वर्षभराच्या कार्यक्रमात अजिबात उसंत नाही. एकापाठोपाठ एक मालिका होत आहेत. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. आलेल्या अर्जामधून पुढील प्रक्रियेसाठी निवड केलेल्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.’’

भारतीय संघातील वातावरण अतिशय चांगले असल्याची ग्वाही या वेळी चौधरी यांनी दिली. कुंबळे यांच्या भवितव्याविषयी भाष्य करण्याचे त्यांनी प्रकर्षांने टाळले. याबाबत ते म्हणाले, ‘‘प्रशिक्षकाच्या नियुक्तीची प्रक्रिया ही योग्य पद्धतीने स्पष्ट झालेली आहे. क्रिकेट सल्लागार समितीकडे या नियुक्तीचे अधिकार असतील. ते आपली जबाबदारी चोख सांभाळत आहेत.’’

 

Story img Loader