Anil Kumble had a broken jaw in 2002: भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने २००२ च्या अँटिग्वा कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध तुटलेल्या जबड्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्याची पत्नी चेतना हिला वाटले की तो विनोद करत आहे. त्यावेळी कॅरेबियन संघात ब्रायन लारासारखे फलंदाज होते, ज्यांना कुंबळे सर्वात कठीण प्रतिस्पर्धी मानतो. त्यांच्याकडे एका चेंडूसाठी तीन शॉट असायचे. असे असतानाही कुंबळेने असा धाडसी निर्णय घेतला आणि तुटलेल्या जबड्याने सलग १४ षटके टाकली आणि लारालाही बाद केले.
कुंबळेने जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी माझ्या पत्नी चेतनाला सांगितले की मला ऑपरेशनसाठी भारतात परतायचे आहे. तिने बंगळुरूमध्ये सर्व व्यवस्था केली. फोन ठेवण्यापूर्वी मी तिला सांगितले की मी गोलंदाजी करायला चाललो आहे. तिला वाटले मी मस्करी करतोय. तिने ते गांभीर्याने घेतले असेल, असे मला वाटत नाही.”
जबडा मोडूनही विकेट घेण्याची जबाबदारी –
माजी कर्णधार म्हणाला की त्याचा जबडा तुटला असला तरी संघासाठी काही विकेट्स मिळवणे ही आपली जबाबदारी आहे, असे त्याला वाटत होते. तो म्हणाला, “जेव्हा मी ड्रेसिंग रूममध्ये गेलो तेव्हा मी सचिनला गोलंदाजी करताना पाहिले. कारण संघात तो एकमेव गोलंदाज होता. त्यावेळी वेव्हेल हिंड्स फलंदाजी करत होता. मला वाटले की ही माझी संधी आहे. मला जाऊन विकेट घ्यावी लागेल. जर त्यांच्या तीन-चार विकेट घेतल्या, तर आम्ही सामना जिंकू शकतो. मी अँड्र्यू लीपसला सांगितले की मला जावे लागेल.”
फलंदाजी करताना लागला होता चेंडू –
कुंबळे दुसऱ्या दिवशी बंगळुरूला परतणार होता. त्यावेळी तो म्हणाला, “मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न केले हे जाणून किमान मी घरी जाईन.” सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना कुंबळेला मर्विन डिलनचा चेंडू लागला होता पण रक्तस्त्राव होऊनही त्याने आणखी २० मिनिटे फलंदाजी केली होती. दोन्ही संघांनी पहिल्या डावात ५०० हून अधिक धावा केल्याने सामना अनिर्णित राहिला.
लाराकडे प्रत्येक चेंडूसाठी तीन शॉट्स होते –
त्याने ब्रायन लारा, सईद अन्वर, जॅक कॅलिस आणि अरविंद डी सिल्वा यांना त्याच्या काळातील सर्वात कठीण फलंदाजांमध्ये नाव दिले. तो म्हणाला, “ही चांगली गोष्ट आहे की त्या काळातील बहुतेक सर्वोत्कृष्ट फलंदाज माझ्या संघात होते. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण यांना गोलंदाजी करणे किती कठीण गेले असते. तरी अरविंद डी सिल्वाला गोलंदाजी करणे कठीण होते आणि लाराकडे प्रति चेंडूसाठी तीन शॉट्स होते.”