या सामन्यापूर्वी मी अनिल कुंबळेंचा दहा बळींचा व्हिडीओ पाहिला होता आणि योगायोग असा की, त्यानंतरच्याच सामन्यामध्ये मला १० बळी मिळवण्याची किमया साधता आली. माझ्यासाठी हे सारे स्वप्नवत असेच होते. खेळपट्टी ही फलंदाजीसाठी पोषक होती, पण आपण चांगला चेंडू टाकला तर नक्कीच आपल्याला बळी मिळणार, हा विश्वास मनामध्ये होता. नऊ बळी मिळवेपर्यंत फक्त आनंद वाटत होता, त्यावेळी आपण दहावा बळीही मिळवू शकतो, असा विश्वास निर्माण झाला आणि माझ्याकडून तो चमत्कार घडला. त्याक्षणी मी नि:शब्द होतो. काय करावे, बोलावे सुचत नव्हते. आनंद गगनात मावेनासा झाला होता, असे कांगा लीगमध्ये पय्याडे क्लबमधून खेळताना एमआयजीविरुद्ध एका डावात दहा बळी मिळवणारा ‘लेग स्पिर’ प्रदीप साहू सांगत होता.
क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी साहू हरयाणाहून मुंबईला आला. त्यानंतर पय्याडेकडून तो मुंबईत स्थिरावू पाहत आहे. भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आणि ऑस्ट्रेलियाचा महान ‘लेग स्पिनर’ शेन वार्न हे त्याचे आदर्श. या दोघांना भेटायला मिळाले नसले तरी तो त्यांचे व्हिडीओज पाहत शिकण्याचा प्रयत्न करतो.
माझे ध्येय असे काही मोठे नाही. मी मोठी ध्येये डोळ्यापुढे ठेवत नाही. फक्त यापुढचा चेंडू कसा टाकायचा, याचाच विचार मी करत असतो. कारण तो चेंडू जर चांगला पडला तर मला बळी मिळू शकतो आणि निवड समितीचे लक्ष वेधता येऊ शकते. मुंबईकडून खेळायला मला नक्कीच आवडेल. गेल्या वर्षी आयपीएलच्या लिलावाच्या यादीमध्ये माझे नाव होते, पण निवड होऊ शकली नाही. पण कदाचित यावेळी निवड होईल, अशी आशा बाळगून असल्याचे साहू म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा