आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीच्या बैठकीमध्ये चर्चा
कसोटी खेळपट्टय़ांच्या दर्जाबाबत भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील आयसीसी क्रिकेट समितीकडून चिंता प्रकट करण्यात आली. घरच्या मैदानावर संघाला अनुकूल ठरेल अशी खेळपट्टी तयार करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे, असे ताशेरे आयसीसीने ओढले आहेत.
‘‘कसोटी क्रिकेटसंदर्भातील अन्य विषयांवर या बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे. कसोटी सामन्यांच्या खेळपट्टय़ांचा दर्जा हा चिंताजनक आहे. याचप्रमाणे मायदेशातील संघाला अनुकूल खेळपट्टय़ाच तयार केल्या जात आहेत,’’ असे आयसीसीने म्हटले आहे.
योगायोगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांच्याच नागपूरमधील खेळपट्टीबाबत गतवर्षी वाद उद्भवला होता. आयसीसीच्या खेळपट्टी आणि मैदान समितीने यजमान संघटनेला अधिकृतपणे तंबी दिली होती. कारण भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामना फक्त अडीच दिवसांत संपला होता. आयसीसीच्या क्रिकेट समितीमधील प्रसारमाध्यम प्रतिनिधी असलेले शास्त्री त्या मालिकेदरम्यान भारतीय संघाचे संचालक होते. परंतु मनोहर आणि शास्त्री हे दोघेही या महत्त्वाच्या बैठकीला हजर नव्हते, असे आयसीसीने म्हटले आहे. मागील वर्षी रणजी सामन्यांच्या खेळपट्टय़ांच्या दर्जाविषयी भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने चिंता व्यक्त केली होती.
सर्वच देशांमध्ये दिवसरात्र कसोटी सामन्याचा कसा प्रसार होईल, याबाबत या बैठकीत चर्चा झाली. चेंडू, खेळपट्टी, प्रकाशझोत आणि वातावरण याचप्रमाणे बॅट आणि बॉल यांचे झुंज हे कशा पद्धतीने रंगेल, यावर या चर्चेत भर देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेषत: पंचांसाठी तंत्रज्ञानाच्या अधिक वापराबाबत या बैठकीत समितीने चर्चा केली. एमआयटीच्या अभियंत्यांनी या वेळी पंच पुनर्आढावा प्रक्रियेबाबत (डीआरएस) सादरीकरण केले. जूनमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीच्या आणि मंडळांच्या बैठकीत हे प्रस्ताव पुन्हा चर्चेला येतील.