किमयागार फिरकीपटू आणि भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेचा रविवारी औपचारिकरीत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. क्रिकेट जगतातील या प्रतिष्ठांच्या मांदियाळीत सामील होणारा कुंबळे हा चौथा भारतीय तर एकंदर ७७वा खेळाडू आहे. कुंबळेच्या बरोबरीने ज्येष्ठ महिला क्रिकेटपटू बेटी विल्सन यांचाही या यादीत समावेश करण्यात आला. डावात दहा बळी घेण्याचा अद्भुत विक्रम नावावर असलेल्या कुंबळेच्या नावावर १३२ कसोटीत तब्बल ६१९ विकेट्सची नोंद आहे. सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्यांच्या यादीत तो अव्वल तीनमध्ये आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यानच्या विश्वचषकातील लढतीदरम्यान कुंबळे आणि विल्सन यांना गौरवण्यात आले. दिग्गजांच्या पंक्तीत सहभागी व्हायला मिळणे ही सन्मानाची गोष्ट असल्याचे कुंबळेने सांगितले.

Story img Loader